ठाणे : गेले काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरू होते. परंतु, आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणीकपात तूर्तास रद्द केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणीकपात केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी जोपर्यंत पाऊस आहे, तोपर्यंत ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणीकपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू केली होती. सुरुवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणीकपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु, त्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. पाण्याच्या या कपातीवरून महासभेतही अनेकवेळा आवाज उठवण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पाहावयास मिळाले होते.दरम्यान, आता काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला, तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणीकपात तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. जोपर्यंत पावसाची अशीच कृपा राहील, तोपर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे... तर पुन्हा पाणीकपातअद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही. तलावांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही. परंतु, सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणीकपात करावी लागेल, असेही पालिकेने स्पष्ट केले.
पाणीकपातीपासून ठाणेकरांची तूर्त सुटका, पावसाने दिला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 2:36 AM