ठाणे : सध्या तलावपाळी येथे मोठ्या प्रमाणावर सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी पाहायला मिळत आहेत. या पक्ष्यांना इतक्या जवळून पाहणे ही ठाणेकरांसाठी पर्वणीच आहे; परंतु या पक्ष्यांना तलावपाळी येथे फिरायला येणारे ठाणेकर कृत्रिम खाद्यपदार्थ खायला घालून त्यांना त्यांच्या मूळ खाण्यापासून परावृत्त करत आहेत. सीगल्स म्हणजेच कुरव पक्षी हे सर्वभक्षी असल्याने त्यांना अशा प्रकारचे कृत्रिम खाद्य देऊन त्यांच्या जिवाशी खेळणे थांबवावे. यासाठी ठाण्यातील पक्षीप्रेमींनी रविवारी सकाळी तलावपाळी येथे जनजागृती केली.
पाणथळ जागांवरच्या अधिवासात सामान्यतः जिवंत व मृत छोटे मासे, खेकडे, किडे यावर कुरव पक्ष्यांची गुजराण चालते. त्यांना परतीच्या प्रवासासाठी लागणारी ऊर्जा नैसर्गिकरीत्या प्राप्त होत असलेल्या या अन्नाद्वारे प्रथिने व जीवनसत्वांमधून मिळते. अतिरिक्त ऊर्जा ही चरबीच्या रूपात शरीरात साठवून ठेवली जाते. परतीच्या प्रवासात अन्नाबाबत शाश्वती नसते, तसेच प्रवास निर्धारित वेळेत पार पाडावयाची असतो, कारण विणीच्या हंगामासाठी त्यांना हिमालयामधील आपल्या अधिवासात त्याची जय्यत तयारी करावयाची असते. ही सर्व गणिते जुळवायची तर त्यांचा विणीपूर्व स्थलांतराचा हंगाम हा चांगलेचुंगले अन्न खाऊन धष्टपुष्ट होण्याचा असायला हवा; परंतु आजकाल ठाणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये नागरिकांकडून त्यांना शेव, गाठी, पाव, बिस्किटे इतर धान्य असे चारण्याचा प्रकार सर्रास घडताना दिसतो आहे. यामागे नागरिकांचा हेतू जरी चांगला असला तरी यामुळे पक्ष्यांचे फार मोठे नुकसान होते. कुतूहलापोटी, मनोरंजनाकरिता किंवा भूतदयेच्या कल्पनेमुळे जरी नागरिक पक्ष्यांना खाऊ घालत असले, तरी असे कृत्रिम अन्न त्यांना एकतर पचवता येत नाही किंवा त्यापासून त्यांच्या शरीराला धोका पोहोचतो. असे खाणे हे त्यांच्याकरिता विषासमान असते याची त्यांना जाणीव नसते. शरीराला जीवनावश्यक घटक न मिळाल्याने ते अनेक रोगांना सहजच बळी पडतात. कुरव पक्षी कळपात राहणारे असल्याने झपाट्याने अशा रोगांचा प्रादुर्भाव कळपातील इतर निरोगी पक्ष्यांमध्ये पसरू शकतो. जवळच्या शहरी पक्ष्यांमध्ये सुद्धा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता असते, असे जनजागृतीत सांगण्यात आले.
---------------
बातमी पुढे