ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत चार मोबाइल लसीकरण सेंटर तयार करून शनिवारपासून नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस देण्यास सुरुवात केली. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. याचा पहिला मान ठाण्यातील सावरकरनगर, खारटन रोड, गांधीनगर, कोपरी कॉलनी आणि साठेवाडी नौपाडा या ठिकाणांना मिळाला आहे.
शहरातील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये राहणारे नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये तसेच इतर लसीकरण केंद्रांवर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही चार मोबाइल लसीकरण सेंटर सुरू केली आहेत.
या लसीकरण सेंटरमध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ व्हॅक्सिनेटर, २ डेटा ऑपरेटर, आणि १ निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.
शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी ११.०० ते ३.०० या वेळेत नागरिकांना त्यांच्या घराजवळ पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी दररोज वेळापत्रक निश्चित करून लसीकरणाची ठिकाणे जाहीर करण्यात येणार आहेत.