ठाणे: ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ चोरणा-या गुडीया राजभर या महिलेच्या घरातून ताब्यात घेतलेल्या सहा मुलांची बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने डीएनए तपासणी केली. या सर्व मुलांना आता नवी मुंबईतील बाल सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले आहे.या सर्वांना पोलिसांनी पदरमोड करुन नविन कपडेही घेऊन दिले. त्यांच्या जेवणाचीही सोय केली. त्यांच्यामधील सर्वात मोठया ११ वर्षांच्या सुप्रिया या मुलीनेही आम्ही सर्व गुडीया आणि सोनू राजभर यांचीच मुले असल्याचा दावा केला. मंगळवारी बाल कल्याण समितीने मुलांच्या डीएनएची तपासणी करण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांची बुधवारी जिल्हा रुग्णालयात ही तपासणी करण्यात आली. त्यांच्या डीएनए तपासणीचे नमुने मुंबई, कलीना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या मुलांपैकी सिता राजभर (दोन महिने), अनिता (५) आणि सूरज (३) या तीन मुलांना नेरुळच्या विश्वबालकेंद्र येथे तर सुप्रिया (११), सोनी (९) आणि खुश्बू (७) या तीन मुलांना नवी मुंबईतील सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टच्या बालसुधारगृहात संगोपनासाठी ठेवण्यात आले आहे. आले होते. या सर्वच मुलांची डीएनए तपासणी करण्याची परवानगी बाल कल्याण समितीनेही ठाणे पोलिसांना दिली. राजभर दाम्पत्य आणि त्यांचा शेजारी विजय श्रीवास्तव उर्फ कुबडया यांनी दिलेल्या माहितीमध्ये कितपत तथ्यता आहे, याची दुस-या दिवशीही चाचपणी सुरु होती. मात्र, विजयची पत्नी डॉलीचे दहा वर्षांपूर्वी आजारामुळे निधन झाले होते. त्याचवेळी कालांतराने त्याच्या पाच वर्षीय मुलाचाही मृत्यु झाला होता. त्याला मुलगा हवा होता. पूर्वी त्यामुळे त्याच्या इच्छिपोटीच हे कृत्य केल्याचे राजभर दाम्पत्याने दुसºया दिवशीच्या चौकशीतही पुनरुच्चार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील मुल चोरी प्रकरण: ‘त्या’ सहा मुलांची पोलिसांनी केली ‘डीएनए’ तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 7:32 PM
ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरणा-या दाम्पत्याने त्यांच्याकडील मुले स्वत:ची असल्याचा दावा केला आहे. मात्र, याची पडताळणी करण्यासाठी त्यांच्याकडील सहाही मुलांची बुधवारी डीएनए तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देपालकांच्या अटकेमुळे पोलिसांनीच दिले मुलांना कपडे आणि जेवणसर्व मुलांची नवी मुंबईच्या बालसुधारगृहात रवानगी