सुरेश लोखंडे।ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा तब्बल ३९ कोटी रुपयांच्या तोट्यात धावत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, मागील वर्षाचा तोटा काही अंशी कमी करण्यास यश मिळाल्याचे समाधान येथील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.कोकणातील गणपती उत्सवासह यात्रा, लग्न समारंभ, सहली आदी प्रासंगिक करारांसाठी धावाधाव करून रोजची प्रवासी सेवाही न चुकता दिली जात आहे. तरीदेखील ठाणे विभागाचा तोटा भरून काढण्यास एसटी कासवगतीत आहे. मागील आर्थिक वर्षात म्हणजे २०१६-१७ मध्ये सुमारे ४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक ठाणे विभाग तोट्यात होता. यंदाच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असता सुमारे सहा कोटी रुपयांनी हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी वर्षभर धावल्याचे दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यातील काही डेपोंच्या उत्पन्नाबाबत ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण म्हणाले की, ठाणे या मध्यवर्ती आगारात यंदा ५१ लाखांचा फायदा झाला. याशिवाय, ठाणे क्र.१ ला एक कोटी रुपये तर भिवंडीला सुमारे ११ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचा अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.कल्याण बस आगारास वर्षभरात दोन कोटी १९ लाख रुपये, मुरबाडला दोन कोटी ९८ लाख विठ्ठलवाडी बस आगारापासून केवळ १६ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फायदा जरी झालेला दिसत नसला, तरी सुमारे सहा कोटींचा तोटा कमी करण्यासाठी यश मिळाल्याचे ते म्हणाले. यात ठाणे क्र.१ ने एक कोटी २६ लाख तर ठाणे क्र.२ ने सुमारे ६६ लाखांनी तोटा भरून काढला. याशिवाय भिवंडीने एक कोटी चार लाख रुपये, शहापूरने पाच लाख ९३ हजार, कल्याण आगारने एक कोटी १० लाख, मुरबाडने ८१ लाख आणि विठ्ठलवाडीने ६२ लाखांनी मागील तोटा भरण्यासाठी प्रयत्न केल्याचे चव्हाण म्हणाले.उन्हाळी सुटीसाठी बसेसउन्हाळी सुटीत गावी जाणाºया प्रवाशांवर लक्ष केंद्रित करून राज्यात २६ बस सोडल्या आहेत. यामध्ये ठाणे क्र.१ येथून मुरूड, शिंदी, चिपळूण, कावळे या मार्गांवर तर ठाणे क्र.२ येथून तुळजापूर, कराड, फलटण, पंढरपूर आदी मार्गांवर त्या सोडल्या आहेत. तर भिवंडी येथून कोल्हापूर, अहमदपूर, शेगाव या शहरांसाठी गाड्या सोडल्या आहेत.शहापूर येथून साक्रीसाठी तर कल्याण ते अक्कलकुवा बसेससह विठ्ठलवाडी येथून भगवानगड व बुलडाण्याला आणि वाडा येथून पंढरपूरला दोन बसेस सुरू केल्या आहेत. याप्रमाणेच वातानुकूलित २३ शिवशाही बसेस तोटा भरून काढण्यास मदत करण्याची अपेक्षा आहे. त्यातून नुकत्याच डोंबिवली-पुणे, ठाणे-कोल्हापूर व शेगाव येथे शिवशाही धावली.
ठाण्यात एसटीला यंदा ३९ कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:25 AM