ठाणे : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाण्याच्या नाटकाने मुंबईत बाजी मारली. या स्पर्धेत मुंबई (१) केंद्रातून स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे या संस्थेच्या ‘आदिम’ या नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. सोमवारी मुंबई (१) केंद्राचा निकाल जाहीर करण्यात आला.बृहन्मुंबई मनपा सहप्रमुख कामगार अधिकारी, मुंबई या संस्थेच्या ‘भेटी लागी जीवा’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक तर प्रयोग, मालाड या संस्थेच्या कथेकरी या नाटकास तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. अदिम नाटकाचे लेखन लेखा त्रैलोक्य, दिग्दर्शन दुर्गेश आकेरकर, नेपथ्य कल्पेश पाटील, प्रकाशयोजना योगेश केळकर, संगीत सुनिता फडके, वेशभूषा वंदना परांजपे, रंगभूषा केदार ओटवणेकर, रंगमंच व्यवस्था गजानन साप्ते यांची आहे. नम्रता सावंत (चंदा), राधिका भट (वसु), नेहा पाटील (बेला), सुनिल तांबट (सुहास) या कलाकारांनी यात भूमिका केली आहे. आदिम हे नाटक अडीच तासांचे असून ते स्त्री - पुरूष नातेसंबंधावर आधारीत आहे. प्राथमिक फेरीसाठी गेली दोन महिने या नाटकाचा सराव केला होता. अंतिम फेरीच्या सरावाचा श्री गणेशा तारीख जाहीर झाल्यानंतर करणार असल्याचे दिग्दर्शक आकेरकर यांनी सांगितले. दिग्दर्शनात प्रथम पारितोषिक महेंद्र दिवेकर, द्वितीय पारितोषिक दुर्गेश आकेरकर, प्रकाश योजना प्रथम पारितोषिक योगेश केळकर, द्वितीय पारितोषिक उन्मेष विरकर, नेपथ्यमध्ये प्रथम पारितोषिक संतोष कदम, द्वितीय जयेश चव्हाण, रंगभूषामध्ये प्रथम पारितोषिक प्रशांत उजवणे, द्वितीय देवा सरकटे, उत्कष्ट अभिनय रौप्यपदक सुनील तांबट व नम्रता सावंत, अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे राधिका भट, संध्या कुटे, तनीषा वर्दे, श्वेता कटारे, विजय कृष्णा, निनाद आरोंदेतक, शंतनु राऊत, राजेश पाध्ये आदींना प्राप्त झाले. ६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण २० नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुहास जोशी, रवी फलटणकर, सुनिता पाटणकर यांनी काम पाहिले.
ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:02 AM