ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट मीटरचा मार्ग अखेर गुरुवारी मोकळा झाला. स्मार्ट सिटी मंडळाच्या संचालक मंडळाच्या सातव्या बैठकीत यासंदर्भातील वाढीव आर्थिक तरतुदीला मंजुरी मिळाली. याशिवाय निधी येऊनही रखडलेले काही प्रकल्पही या बैठकीत चर्चेसाठी पटलावर ठेवले होते. त्यातील ठाणे शहर व पोलिसांच्या कमांड कंट्रोल रूमसह एकीकृत शहर डाटा सेंटर डिझाइन आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठीचा प्रस्ताव, मासुंदा तलाव फुटपाथ, स्मार्ट सिटी वेबसाइट आदींसह इतर महत्त्वाच्या विषयांना बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे हे प्रकल्पही सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्यानंतर या शहरासाठी तब्बल ४५० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. परंतु, त्याचा विनियोग सुमारे चार महिने करणे पालिकेला जमले नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने पालिकेची कानउघाडणी केली होती. त्यानंतर, पालिकेने आपले काही प्रकल्प हे स्मार्ट सिटीतून करण्याचा निर्णय घेऊन २६ प्रकल्पांपैकी सुमारे १२ प्रकल्पांच्या वर्क आॅर्डर दिल्या असून २१ प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे. तर, आलेल्या ४५० कोटींच्या निधीपैकी पालिकेला केवळ ५८ कोटींचाच खर्च करता आल्याची बाब सप्टेंबर महिन्यात समोर आली होती.
दरम्यान, पालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत परिसर विकास आणि सर्व शहराचा विकास अशी कामांची वर्गवारी केली आहे. त्यानुसार, परिसर विकासात १० प्रकल्पांचा समावेश असून सर्व शहर विकासात सहा प्रकल्पांचा समावेश आहे. आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने गेली ११ वर्षे पालिका नळसंयोजनांवर मीटर बसवण्यासाठी विविध पद्धतीने निविदा काढल्या होत्या. अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हे मीटर बसवले जाणार असून पालिकेने काढलेल्या निविदेलादेखील प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात एक लाख १३ हजार नळसंयोजनांवर स्मार्ट मीटर बसवणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
या कामासाठी १०४.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या बैठकीत या मीटरचा बोजा ठाणेकरांवर पडू नये, असा निर्णय घेण्यात आला. ठामपा स्मार्ट सिटीतून ७० तर ३० टक्के खर्च स्वत: उचलणार आहे. त्यानुसार, आता एक लाख १३ हजार स्मार्ट मीटर पहिल्या टप्प्यात बसवणार असून यात इमारतींचा समावेश असणार आहे. याअंतर्गत निगा देखभाल, मीटर रीडिंग, बिले देणे आदी कामेही संबंधित संस्थेला करावी लागणार आहेत. त्यानुसार, या वाढीव तरतुदीच्या प्रस्तावाला गुरुवारच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे आता नवीन वर्षात स्मार्ट मीटरची योजना सुरू होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.
दोन हजार सीसीटीव्हींपैकी शहराच्या मुख्य भागांमध्ये आजघडीला ४५० च्या आसपास कॅमेरे लागले आहेत. त्यानुसार, ठाणे शहर व ठाणे पोलिसांच्या कमांड व कंट्रोल रूमसह एकीकृत शहर डाटा सेंटर डिझाइन, प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पाच वर्षांसाठी आॅपरेशन देखभाल आणि व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेच्या निवडीचा प्रस्तावही मंजूर झाला.