ठाणे : ठाणे जनता सहकारी बँकेने (टीजेएसबी) आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये यंदाही सातत्य राखून भरीव कामगिरी केली आहे. २०१७-२०१८ या आर्थिक वर्षामध्ये बँकेचा १५ हजार ३४० कोटी इतका व्यवसाय झाला असून ढोबळ नफा २०२ कोटी इतका झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नंदगोपाल मेनन यांनी मंगळवारी दिली.बँकेच्या १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. या आर्थिक वर्षावर बँकांची भांडवलीकरणाची पुनर्रचना, दिवाळखोरीचा कायदा, वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी याचा प्रभाव होता. या पार्श्वभूमीवर टीजेएसबीने केलेली कामगिरी प्रभावी आहे. या आर्थिक वर्षात बँकेने नऊ नविन शाखा सुरु केल्या आहेत. बँकेने इंदोर येथे शाखा सुरु करुन मध्यप्रदेशात पदार्पण केले आहे. सध्या ही बँक महाराष्टÑासह गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमधील १३६ शाखांमधून तंत्रज्ञानपूरक सुलभ ग्राहक सेवा देत आहे. बँकेला २०२२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. अर्धशतकात प्रवेश करताना बँकेने २५ हजार कोटींचा एकूण व्यवसाय आणि २०० शाखांचे उद्दिष्ट ठेवल्याचेही मेनन यांनी सांगितले. गेल्या वर्षी बँकेच्या ठेवी नऊ हजार ३५१ कोटी होत्या. यंदा त्या नऊ हजार ८७५ कोटी इतक्या झाल्या आहेत. ही वाढ ५.६० टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी पाच हजार कोटींचे तर यंदा पाच हजार ४६५ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले. ही वाढही ९.३० टक्के इतकी आहे. बँकेचा ढोबळ नफा २०२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी १६९ कोटी होता. यातही १९.५६ टक्के इतकी भरीव वाढ झाली आहे. ढोबळ नफ्याची द्विशतकी झेप सध्याच्या बँकिंग क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष उल्लेखनीय असल्याचेही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी सांगितले.आव्हाने संधी म्हणून स्वीकारून ती लीलया पार करता येते. याचा प्रत्यय आपल्या व्यवहारातून बँकेने सिद्ध केल्यानेच हे यश मिळाल्याचे साठे म्हणाले.बँकेचा निव्वळ नफा १२६ कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या (१०२ कोटींच्या) तुलनेत ही वाढही २३ टक्के इतकी आहे. बँकेचा स्वनिधी एक हजार एक कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १२६ कोटींनी वाढला आहे.
‘‘पारदर्शक व्यवहार, तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि अधिकाधिक वापर, कुशल व्यवस्थापन तसेच ध्येयाने प्रेरित मनुष्यबळ हे बँकेच्या यशाचे मानकरी आहेत.’’सुनील साठे, व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, टीजेएसबी, बँक, ठाणे