ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणी पुरवठा बुधवार पासून बंद झाला होता. गुरुवारीसुध्दा ठाणेकरांचे पाण्यासाठी हाल झाल्याची परिस्थिती होती. त्यानंतर सांयकाळी काही भागांना एक तास पाणी पुरवठा सुरु करण्यात आला होता. तर काही भागांना शुक्रवारी सकाळी एक तास पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे आता टप्याटप्याने अनेक भागांचा पाणी पुरवठा कमी दाबाने सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. असे असले तरी अनेक भागांना खास करुन घोडबंदर, कोपरी, टेकडी बंगला, उंचावरील भागांमधील नागरीकांना पाण्यासाठी टँकरवर झुंबड उडाल्याचे चित्र दिसत होते.
ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर गुरुवारी पाच नंतर महापालिकेचे चारही पंप सुरळीत सुरु करण्यात आले. परंतु भातसा ते पिसे असा कॅनलचा १६ किमीचा प्रवास करतांना पाणी पंपापर्यंत पोहचण्यास विलंब झाला. तसेच पाणी नसल्याने हे कॅनल कोरडे पडले होते. त्यामुळे पालिकेने त्यातील गाळ काढल्याने त्याची खोली वाढली होती. त्यामुळे सुध्दा पाणी पोहचण्यास उशिर झाला. अखेर सांयकाळी पाच नंतर टप्याटप्याने शहरातील काही भागांमध्ये एक तास पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आणि पुन्हा सांयकाळी एक तास असा पाणी पुरवठा करण्यात आला.परंतु या मधल्या काळात अनेक भागांना अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याचा फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून तर काही भागांमध्ये खाजगी टँकर मार्फत पाणी पुरवठा केला जात होता. झोपडपट्टी भागात तर पाण्यासाठी नागरीकांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. रोज महापालिकेच्या माध्यमातून ४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे टँकरची संख्या वाढविण्यात आली होती. तसेच खाजगी टँकरची संख्या सुध्दा वाढविण्यात आली होती. तर रोज होणाऱ्या फेऱ्यांपेक्षा तिप्पट फेऱ्या झाल्याचे दिसून आले.