ठाणे : ‘मंदिरात दान करायचे आहे, तुम्ही मंदीराचे ट्रस्टी आहात का?’ अशी विचारणा करुन नंतर बोलण्यात गुंतवून कोपरीतील वाघजई मंदिराचे ट्रस्टी तानाजी कवे यांच्याकडून अंगठी आणि सोनसाखळी असा ८४ हजारांचा ऐवज लुबाडण्यात आला. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कवे त्यांचे साडू अंकुश मालुसरे आणि त्यांचे माम सासरे चंद्रकांत चव्हाण हे कोपरी कॉलनी येथे ६ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास वाघजई मंदिराजवळ उभे होते. तेंव्हा एका भामट्याने त्यांना ट्रस्टींबाबत विचारणा केल्यावर तानाजी यांचे भाऊ शिवाजी यांनी ‘तुला काय दान टाकायचे ते पेटीत टाक,’ असे त्याला सांगितले. त्यावर आपण सोनार असून माझ्या दानाला तुमच्या हातातील सोन्याचा स्पर्श करा, असे त्याने सांगितले. तानाजी यांनी त्यांची १४ हजारांची अंगठी आणि ७४ हजारांची रुद्राक्षांची सोन्यात गोफण केलेली चेन त्यांच्या दानाला लावली. त्यानंतर तो भामटा आणि हे सर्वजण मंदिराबाहेर पडले. तेंव्हा अंगठी आणि रुद्राक्षाची गोंफण असलेली सोनसाखळी त्या भामटयाने लांबविल्याचे कवे यांच्या लक्षात आले. त्याचा परिसरात शोध घेऊनही तो आढळून न आल्याने याप्रकरणी त्यांनी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हवालदार साळुंखे याप्रकरणी तपास करीत आहेत. वारंवार जनजागृती करूनही दागिने घालूनच घराबाहेर पडत आहेत. तसेच भामट्यांच्या निरनिराळ्या युक्त्यांना बळी पडत आहेत. (प्रतिनिधी)
ठाण्यात पाऊण लाखाचे दागिने लुबाडले
By admin | Published: July 09, 2015 11:49 PM