लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कला, शिक्षण, सामाजिक, उद्योग आणि साहित्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ठाणेकरांना रविवारी गडकरी रंगायतन येथे झालेल्या सोहळ्यात पितांबरी ठाणे नगररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नगर विकास मंचच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांच्या हस्ते देण्यात आला. शिक्षण क्षेत्रासाठी डॉ. विजय जोशी यांना मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या हस्ते, तर सामाजिक क्षेत्रासाठी डॉ. अरु ंधती भालेराव यांना प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रासाठीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले उद्योजक मिलिंद नागरे. त्यांना पितांबरीचे कार्यकारी संचालक अजय जोशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. साहित्य क्षेत्रासाठी लेखक श्रीराम बोरकर यांना प्रसिद्ध लेखक शशिकांत कोनकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले.सोहळ्याच्या सुरुवातीला गुजरातमधील पाटण येथील जमिनीखालील शिल्पमंदिरावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम ‘रानी की बाव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यातील नृत्य आणि अभिनयाचा कलाविष्कार पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या पुरस्कार सोहळ्याला नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नगरविकास मंचचे अध्यक्ष अॅड. सुभाष काळे भाजपा ठाणे शहराध्यक्ष अॅड. संदीप लेले, भाजपाचे ठाणे मनपा गटनेते मिलिंद पाटणकर उपस्थित होते.
ठाण्यात रंगला नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा
By admin | Published: May 11, 2017 1:56 AM