ठाणे - ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन जवळ असलेल्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या असमन्वयामुळे अजूनही सुटलेला नसल्याची बाब समोर आली आहे. या झोपड्यांवर अद्याप कारवाई सुध्दा झालेली नाही. ठाणे आणि मुंबई महापालिकेची एक संयुक्त बैठक लवकरच होणार असून त्यानंतरच या नागरिकांचा पुनर्वसनाचा तिढा सुटणार असल्याचे पालिकेने आता स्पष्ट केले आहे. शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्द्याला हात घातला. वन विभागाच्या जागेवरील झोपड्यांना मालमत्ता कर लावता येत नसल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेसाठी आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन लगत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर कसा लावण्यात आला असा प्रश्न भोईर यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ज्यांना आपण सेवा सुविधा देतो त्यांना मालमत्ता कर लावत असल्याचे स्पष्ट करत अनाधिकृत स्ट्रक्चर असेल आणि त्याला मालमत्ता कर लावण्यात आला असेल तरीही ते स्ट्रक्चर अधिकृत होत नसल्याचे बुरपुल्ले यांनी सभागृहात स्पष्ट केले.देवराम भोईर यांनी मुंबई महापालिकेच्या तानसा पाईप लाईन जवळ असलेल्या झोपड्यांना कारवाईच्या नोटीसा पाठवण्यात आल्या असून ठाणे महापालिकेने त्यांना मालमत्ता कर लावला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या झोपड्यांवर ठाणे आणि मुंबई महापालिकेनेकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे बुरपुल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात २०१२ मध्येच न्यायालयाची नोटीस पाठवली असून यामध्ये या सर्व झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यांचे पुनर्वसन कोणी करायचे यासंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले.या पाईपलाईन लगत १५०० पेक्षा अधिक झोपड्या असून २०१५ ला ही पाईपलीन ज्यावेळी फुटली होती त्यावेळी वागळे, किसन नगर,भागातील हजारो नागरिकांचे नुकसान झाले होते. आता या सर्वांचा पुनर्वसनाचा प्रश्न या दोन यंत्रणाच्या बैठकीनंतरच निकाली निघणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील पाईप लाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 4:13 PM
पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे.
ठळक मुद्देपाईप लाईन लगत १५०० च्या आसपास झोपड्याबैठकीनंतर पुनर्वसनचा होणार निर्णय