ठाणे : ठाणे महापालिका, समाज विकास विभाग व दिव्यांग कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने विशेष मुलांसोबत ‘दीपसंध्या’ या आगळ््या वेगळ््या कार्यक्र माचे आयोजन अभिनय कट्ट्यावर करण्यात आले होते. यात दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांचे नृत्य खास आकर्षण ठरले.
दिव्यांग कला केंद्राच्या मुलांनी नमन सादर करत कार्यक्रमास सुरुवात केली व दर्जेदार सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली. या मुलांची सुधारलेली गुणवत्ता बघून उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे व दिव्यांग कला केंद्राच्या शिक्षकांचे कौतुक केले. उपस्थित रसिकांना दिव्यांग कला केंद्राच्या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा मोह आवरला नाही व या मुलांसोबत अभिनय कट्टयावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीचे स्वागत म्हणून कंदील व दिव्यांची रोषणाई हे देखील प्रमुख आकर्षण ठरले. शरीराने असामान्य वाटणाऱ्या या विशेष मुलांनी कोळी गीत, शेतकरी गीत, दादला नको गं बाई अशा विविध गाण्यांवर नृत्य सादर करत सामान्यांनाही जमणार नाही अशा पद्धतीचे सादरीकरण केले. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणासाठी उपस्थितांनी टाळ््यांचा कडकडाट केला. यावेळी संगीत कट्ट्याच्या कलाकारांनी विविध गाणी सादर केली. माधुरी कोळी, उत्तम ठाकूर, अमोघ डाके यांनी एकपात्री सादर केली. कार्यक्र माचे निवेदन गौरी हुले यांनी केले. दीपप्रज्वलन दिव्यांग कला केंद्रातील मुलांच्या पालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, यावेळी नौपाडा विभागातील मुलांना वेशभूषा स्पर्धेनिमित्त सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदाचा हा ४०१ क्रमांकाचा कट्टा होता. आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दिवाळी आम्हाला या विशेष मुलांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाली असे एका प्रेक्षकाने सांगितले.