ठाणे : यशस्वी तेच होतात, जे अडचणीतही संधी शोधतात त्यात नीलेश गायकवाड यांचे नाव घेता येते. ठाण्याचा सांस्कृतिक इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा व्यास क्रिएशन्स्चा गौरव पहिल्या पानावर केला जाईल. आज घरं अबोल झाली आहेत, अशा काळात ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसारखे पुण्यवान काम ते करीत आहेत. ‘व्यास’ या नावाप्रमाणेच व्यास क्रिएशन्स्चं आयुष्य चिरंजीवी आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
व्यास क्रिएशन्स् प्रकाशन संस्थेच्या तपपूर्ती आनंद सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. विजया वाड उपस्थित होत्या. व्यासपीठावर आशिदाच्या व्यवस्थापकीय संचालिका आशा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, आरोग्यम् मासिकाच्या संपादिका वैद्य सुचित्रा कुलकर्णी उपस्थित होत्या.
डॉ. विजया वाड यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत व्यास क्रिएशन्सचे यश आणि बारा वर्षांचा प्रवास सांगणारी कविता सादर केली. किस्से, आठवणी सांगून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘लौकिकार्थ-सृजनतेचे अनमोल क्षण’ या व्यास क्रिएशन्स्च्या बारा वर्षातील प्रवासाचा आढावा घेणार्या स्मरणिकेेचे प्रकाशन करण्यात आले. "आठवणींच्या हिंदोळ्यावर" असे शीर्षक असलेल्या फलकावर सर्व व्यास क्रिएशन्सच्या प्रेमींनी आपल्या शुभेच्छा व स्वाक्षऱ्या करून आपले व्यास क्रिएशन्सप्रती असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. तसेच, व्यास क्रिएशन्सचे हितचिंतक, लेखक, जाहिरातदार यांचा नीलेश गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पुष्पा लेले संचलित स्वरसंवादिनीतर्फेे गीतरामायणातील निवडक गीतांच्या कार्यक्रमाने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. कार्यक्रमाला संस्थेचे लेखक, हितचिंतक ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.