लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सुमारे १२ तोळयांचे सोन्याचे दागिने असलेली एक बॅगच राज्य परिवहन सेवेच्या एका बसमध्ये विसरल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळताच अवघ्या काही तासांमध्ये त्यांनी या बसचा शोध घेऊन ही बॅग संबंधितांना परत मिळवून दिल्याची घटना रविवारी घडली. आपली बॅग दागिन्यांसह सुखरुप मिळाल्याने नंदकुमार राव यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.नालासोपारा येथील रहिवाशी नंदकुमार सखाराम राव (६३) हे ६ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथून रेल्वेने ठाण्यात आले. नालासोपारा येथे जाण्यासाठी ते अनावधानाने भिवंडीकडे जाणाऱ्या एसटीच्या बसमध्ये बसले. बसच्या वाहकाने त्यांना बस नालासोपारा जात नसल्याचे सांगितल्यानंतर ते पत्नीसह खाली उतरले. त्यांच्याकडे सहा बॅगा होत्या. उतरतांना नेमकी दागिने असलेली एक बॅग ते बसमध्येच विसरले. बस गेल्यानंतर आपली बॅग चोरीस गेल्याचा त्यांचा समज झाला. तशी तक्रारच त्यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. ही तक्रार मिळताच पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बाबर यांनी आपल्या शोध पथकासह एसटी स्थानकात या बसची चौकशी करुन विभाग नियंत्रकांशी संपर्ककेला. त्यानंतर बसचे चालक आणि वाहक यांचा क्रमांकही मिळविला. त्यानुसार बसचे वाहक संकेत कोळी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी ही बॅग बसमध्ये असल्याची माहिती दिली. ही बस दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान भिवंडी स्थानकात पोहचणार होती. बस स्थानकात पोहचण्याच्या पाच मिनिटे आधीच पोलिसांनी त्यांना संपर्क केल्यामुळे बस पुन्हा ठाण्याकडे आल्यानंतर चालक प्रकाश शिंदे आणि वाहक कोळी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात ही बॅग आणून दिली. या बॅगेची ओळख पटवून अवघ्या काही तासांमध्येच सहायक पोलीस निरीक्षक योगेश पगारे, उपनिरीक्षक कृष्णा बाबर आणि पोलीस हवालदार विजयकुमार हिंगे यांनी ती राव दाम्पत्याकडे सुखरुप सुपूर्द केली. बस भिवंडी स्थानकामध्ये पोहचली असती तर भिवंडीमध्ये या बसमध्ये शिरणा-या कोणत्याही प्रवाशाच्या हातात ही बॅग पडली असती. शिवाय, बॅग हरविली की चोरीस गेली? ती नेमकी कोणत्या बसमध्ये गेली? की विसरली? याची कोणतीही विशेष माहिती राव यांच्याकडे नव्हती. तरीही आपली बॅग सुखरुप मिळाल्याबद्दल राव यांनी पोलिसांचे आभार मानले.
ठाणे पोलिसांच्या तत्परतेमुळे दांम्पत्याला १२ तोळयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह बॅग मिळाली परत
By जितेंद्र कालेकर | Published: October 06, 2019 10:31 PM
ठाणे एसटी स्थानकातून एका एसटी बसमध्ये विसरलेली बॅग ठाणेनगर पोलिसांनी अवघ्या दिड तासांमध्येच शोधून काढली. सुमारे १२ तोळयांच्या दागिन्यांसह बॅग सुखरुप मिळाल्याने नंदकुमार राव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ठळक मुद्देएसटीमध्ये विसरली होती बॅगठाणे नगर पोलिसांची कामगिरीअवघ्या दिड तासात घेतला शोध