ठाणे: आझादनगर भागातील सागर कैलास यादव (२५) या प्रामाणिक रिक्षा चालकामुळे एका स्कूटरस्वार चालकाची ५० हजारांची रोकड परत मिळाल्याची माहिती कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी गुरुवारी दिली. ही रक्कम ओळख पटवून मुरारी राम विश्वकर्मा (३६, रा. संभाजी नगर, मनोरमानगर, ठाणे) या कारपेंटरला परत करण्यात आली आहे.
यादव हे २७ डिसेंबर रोजी बाळकुम ते आझाद नगर या मार्गावरुन जात होते. त्याच दरम्यान शिवाजी चौक येथील सार्वजनिक शौचालया जवळ त्यांच्या समोरून जाणाºया एका स्कूटर चालकाची बॅग बॅग खाली पडली. ती बॅग यादव यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणून जमा केली. त्यांच्या समक्ष ती बॅग पोलिसांनी तपासून पाहिली. तेंव्हा या बॅगेमध्ये बॅग धारकाचे व्यवसायाचे लेटर पॅड आणि ५० हजारांची रोकड होती. त्यातील लेटर पॅडच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याच्याशी संपर्क साधून त्यांना कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. चौकशीमध्ये मुरारी राम विश्वकर्मा असे त्यांचे नाव समोर आले. त्यांच्याकडे आधार कार्ड व इतर कागदपत्रांची ओळख पटवून त्यांना त्यांची बॅग आणि ५० हजारांची रोकड तसेच इतर साहित्य बॅगसह पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी परत केले.