महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

By जितेंद्र कालेकर | Published: November 10, 2024 08:53 PM2024-11-10T20:53:26+5:302024-11-10T20:54:04+5:30

* आम्ही पैसे लाटणारे नव्हे तर जनतेचे पैसे जनतेलाच देणारे

Thapanama of Mahavikas Aghadi, Eknath Shinde's criticism of opponents | महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

ठाणे: महाविकास आघाडीने प्रसिद्ध केलेला महाराष्ट्रनामा हा थापानामा आहे. महाविकास आघाडीने महायुतीच्या वचननाम्याचीच नक्कल केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केला. शिंदे यांनी त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात प्रचार रॅली काढली होती. यावेळी त्यांनी हा आरोप केला. सरकारच्या योजनेचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. कारण हे जनतेचे पैसे आहेत, असे सांगत आम्ही जनतेचे पैसे वाटणारे आहोत, त्यांचे पैसे लाटणारे नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी प्रचार रॅली दरम्यान केली.

मुख्यमंत्री निवडणूक लढवित असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातील वागळे इस्टेट, किसननगर या भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. या दरम्यान, नागरिकांशी तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिल्याने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. तर महाविकास आघाडीने जाहीरनाम्याच्या स्वरूपात जो महाराष्ट्रनामा प्रसिद्ध केला. तो महाराष्ट्रनामा नसून थापा नामा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. आमच्याच योजना चोरून विरोधकांनी त्यांचा वचननामा तयार केल्याचाही आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

विरोधक विचारायचे लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार? त्यांनी या योजनेला विरोध करून बदनाम केले. ते न्यायालयातही गेले होते. या योजनेसाठी खोडा घालणाऱ्यांना मत मागायला आल्यावर जोडा दाखवा, योजना बंद करण्यासाठी न्यायालयात का गेला? याचा जाबही विचारा. लाडक्या बहिण योजनेसाठी शंभर वेळा जेलमध्ये जायची जयारी असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांना निवडणुकीत खोटी आश्वासन देऊन केवळ दिशाभूल करायची आहे. आम्ही लाडक्या बहिण योजनेचे पाच हफ्ते दिले. आम्ही हफ्ते घेणारे नाही तर हफ्ते देणारे आहोत. म्हणून लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास ठेवला. असे सांगत विकासाच्या मारेकऱ्यांना जनता विजयी करणार नाही, असेही शेवटी शिंदे म्हणाले.

विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल, अशा पद्धतीने विजयी करा. ज्यामुळे यापुढे कोपरी पाचपाखाडीतून उभे राहण्याची हिंमत विरोधक करणार नाहीत. संपूर्ण राज्यात प्रचार करायचा असल्यामुळे केवळ कोपरी या एकाच मतदारसंघात प्रचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे गाफील राहू नका, सर्वांनी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री म्हणून प्रचार करा, असे आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

Web Title: Thapanama of Mahavikas Aghadi, Eknath Shinde's criticism of opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.