डोंबिवली: रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा संपन्न केला. त्यात ठाकुर्ली, डोंबिवलीतील एस्कलेटर, तिकीट बुकिंग घर, वायफाय सेवा आदींचाही समावेश होता. पण ठाकुर्लीतील एस्कलेटर आणि फलाट क्रमांक १ए वरील तिकीट बुकिंगची सुविधा दोन महिन्यांपासून सुरू झाली होती, पण तरीही त्याच्या उद्घाटनाचा घाट का घातला गेला. केंद्राचे हेच का ते अच्छे दिन, आणखी किती मूर्ख बनवणार, असा सवाल असंख्य प्रवाशांनी केला आहे.ठाकुर्ली स्थानकातील विविध पायाभूत सुविधांची कामे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमाने करण्यात येत आहेत. त्यात स्थानकातील पादचारी पुलाचा प्रामुख्याने समावेश होतो. पुलापाठोपाठ एस्कलेटरची आणि तिकीट घराची सुविधा या ठिकाणी देण्यात आली.तत्कालीन वाणिज्य अधिकारी संजय गुप्ता यांनी एस्कलेटरचा शुभारंभ दोन महिन्यांपूर्वीच केला होता. तसेच पादचारी पुलासह तिकीट बुकिंग आॅफिस आणि फलाट १ए चे लोकार्पण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच खासदार श्रीकांत शिंदे व शिवसैनिकांनी त्याचवेळी केले होते.तेव्हा देखील भाजपा-शिवसेना यांच्यातील कलगी तु-याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे सर्वश्रुत आहे. पण तसे असतांनाही रेल्वे प्रशासनाने बुधवारी ठाकुर्लीच्या एस्कलेटर आणि तिकीट बुकिंग घराच्या शुभारंभाचा घाट का घातला. त्या ई - ओपनिंग करून काय साध्य केले असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.ठाकुर्लीच्या सेवांचा शुभारंभ मी तेथे असतांनाच झाला होता, गुरुवारी रेल्वेमंत्र्यांसह महाव्यस्थापक, आणि अन्य मान्यवरांनी ठाकुर्लीसंदर्भातील प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले. त्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण राहिले होते ती प्रक्रिया असंख्य उपक्रमांचे निमित्त साधून पूर्ण करण्यात आली - संजय गुप्ता, (स्वीय सचिव, मुख्य वाणिज्य प्रबंधक-मध्य रेल्वे)
हेच का ते अच्छे दिन ?, पुन्हा लोकार्पण सोहळ्याचा रेल्वेचा घाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 5:23 PM