- जितेंद्र कालेकर ठाणे : आयपीएलच्या क्रिकेटवर चालणाऱ्या सट्टा बाजारात यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि पक्षनिहाय कोणाला किती जागा मिळतील, यावरूनही मोठी बोली लागली होती. ठाण्यात शिवसेनेचे विजयी उमेदवार राजन विचारे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार आनंद परांजपे यांच्यासाठीही सर्वाधिक बोली लागली होती. परांजपे जिंकले तर रुपयाला दहा रुपये आणि विचारे जिंकले तर २५ रुपये अशी बोली लागली होती. यात किमान दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणुकीच्या प्रचारापासून ते अगदी मतदान आणि त्यानंतर अगदी मतमोजणीपर्यंत ठाण्यात दुरंगी लढतीचे चित्र होते. तसेच चित्र भिवंडीत होते. कल्याणमध्ये मात्र शिवसेना एकतर्फी जागा जिंकेल, असे भाकित वर्तवले जात होते. तरीही, ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात मतमोजणीपर्यंत तरी फिफटीफिफटी (दुरंगी) लढत होईल, असे चित्र होते. तिकडे भिवंडीत भाजपचे कपिल पाटील यांना दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे यांच्यावरही सट्टा बाजारात चांगलीच बोली रंगली होती. जिथे कपिल पाटील यांच्या विजयासाठी ३५ रुपये तिथे टावरे यांच्या विजयासाठी ५० ते अगदी १०० रुपयांपर्यंत बोली लागली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.बुकींच्या क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही खेळ हा दोन रुपयांमध्ये विभागला जातो. तसाच इथे पक्ष आणि उमेदवारनिहायदेखील सट्टा लावला गेला. त्यामुळे ही मोठी उलाढाल ठरली.एका बुकीने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात अनेकांनी परांजपे जिंकतील, यावर बोली लावून लाखोंचा जुगार खेळला. तर, तिकडे कपिल पाटील यांचा पराभव होईल, अशी बोली लावून रुपयाला दोन रुपये अशी बोली नेली. तर, काही ठिकाणी हाच दर अगदी १० रुपयांपर्यंत होता. म्हणजेच, सट्टाबाजाराचा कल हा काँग्रेसचे सुरेश टावरे जिंकतील असाच होता, तरीही तिथे पाटील निवडून आले. तर, ठाण्यात फिफटीफिफटी चान्सेस आहेत, असे सांगणाऱ्यांनी परांजपे यांना कौल देऊन त्यांच्या विजयाच्या बाजूने लाखोंचा सट्टा लावला होता. त्यामुळे रुपयाला अगदी दहा रुपये आणि २५ रुपयांपर्यंत परांजपे चालले, तर विचारे रुपयाला दोन रुपये १० रुपये असा दर लागला.तिकडे कल्याणमध्ये मात्र राष्टÑवादीच्या बाबाजी पाटील आणि शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील लढत एकतर्फी होण्यावरच कल अधिक असल्यामुळे तिथे फारशी बोली लागली नसल्याचे जाणकारांचे मत होते.बाबाजी पाटील यांच्यासाठी १० रुपये, तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतची बोली होती. अर्थात, ज्यांनी परांजपे, टावरे आणि बाबाजी पाटील जिंकतील, असा दावा करून बोली लावली, त्यांना मात्र या जुगारात हार पत्करावी लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.>आघाडीच्या जागांवर१० हजार कोटींची उलाढालअनेकांनी तर थेट एनडीए आणि आघाडीला किती जागा मिळतील, यावरूनही बोली लावली होती. गुजरात येथून चालणाºया एका आॅनलाइन वेबपोर्टलद्वारे तर भाजपला २४५ की २४८ जागा मिळतील, यावरून १०० रुपये ते एक हजार रुपये असा दर लावला होता. यातही कमीतकमी एक हजार आणि जास्तीतजास्त १० लाखांपर्यंत एकावेळच्या खेळाची मर्यादा होती. त्यामुळे यातही किमान १० हजार कोटींची उलाढाल झाल्याचे बोलले जाते. मात्र, हा सट्टा वेबवर आॅनलाइनच खेळला जात असल्याने सट्टेबाजांना एकीकडे संरक्षण मिळते, तर दुसरीकडे त्यात किती उलाढाल झाली हे गुपित राहते.
ठाण्यातील तिन्ही मतदारसंघांत दोन हजार कोटींचा सट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:29 AM