भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परीसरातून अपहरण केलेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची तब्बल एक महिन्याने सुखरूप सुटका करण्यास भिवंडी शहर पोलीस यशस्वी ठरले.याप्रकरणी आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला यास ताब्यात घेत त्याने १ लाख ५ हजार रुपयांना त्या चिमुरड्याची विक्री केल्याचे कबुल केल्या नंतर विक्री व्यवहार करणाऱ्या दोन महिलांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्ह्याचे दोषरोपपत्र न्यायालयात सादर करताना तपासात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाने न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेची मदत घेत भिवंडी शहरात प्रत्येक्ष घटनास्थळावर आरोपीस घेऊन जात चाचणी घेतली गेली.
प्रत्यक्ष आरोपीचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षात त्याच्या शारीरिक हालचाली या त्याच आहेत. हे तपासून पाहण्यासाठी गेन टेस्ट घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी देत त्यासाठी कलिना मुंबई येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेतील तज्ञांचे पथक घटनास्थळी तो देखावा उभा करून पाहणी करीत असल्याचे सांगितले.प्रत्यक्ष गुन्हा करतावेळी आरोपी ज्या ज्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.
त्या कामतघर हनुमान नगर,पद्मानगर कामतघर रस्त्या वरील करी आर्ट व पद्मानगर येथील तीन सीसीटीव्ही मध्ये आरोपी चिमुरड्यासह कैद झाला होता त्या त्या ठिकाणी ही शारीरिक तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये आरोपीची चालण्याची पद्धत,मूल घेऊन चालतानाची पद्धत तपासली गेली आहे. भिवंडीत प्रथमच असा तपास होत असल्याने त्या ठिकाणी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती