ठाणे: घरात एकटी असलेल्या २४ वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या रशीद उर्फ इम्रान चांद कुरेशी (३०) याला ठाणे न्यायालयाने १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षाही आरोपीला न्यायालयाने बुधवारी सुनावली आहे.
भाईंदरमधील उत्तन भागात २३ आॅगस्ट २०१८ रोजी रात्री १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास ही महिला घरात एकटीच असतांना इम्रान याने तिच्या घरात शिरकाव केला. तिने प्रतिकार केला असता, त्याने लाकडी पाटाने तिला मारहाणही केली. शिवाय, हालचाल केली तर मारुन टाकण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. कहर म्हणजे त्यानंतर त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केले. तशाही अवस्थेत तिने त्याला धक्का मारुन घराबाहेर पळ काढून याप्रकरणी त्याच्याविरुद्ध उत्तन सागरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली होती.
या खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात ३ एप्रिल २०२४ रोजी झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून सहायक पाेलिस निरीक्षक प्रविण साळुंखे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पाेलीस उपनिरीक्षक काकडे आणि दिलीप सनेर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकारी वकील वर्षां चंदने यांनी सात साक्षीदार तपासले. सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एल. भोसले यांनी आरोपीला १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.आरोपीला अशी झाली शिक्षा-आरोपी कुरेशी याला बलात्काराच्या गुन्हयात १२ वर्षांचा करावास आणि दहा हजारांचा दंड तर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली दहा वर्ष कारावास आणि पाच हजारांचा दंड तसेच धमकी प्रकरणी पाच वर्षांचा कारावास तर मारहाणीमध्ये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत.