भिवंडी भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात मागील तीन वर्षांपासून प्रभारी प्रशासनाधिकारी कारभार पाहत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागवार कोणाचेही नियंत्रण राहिले नसून,प्रशासनाधिकारी नसल्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांवाचून वंचित राहावे लागत आहे.
महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण,गणवेश, बुट व इतर शैक्षणिक साहित्य मनपा शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नसल्याच्या बाबी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत पालिका शिक्षण विभागात तत्काळ सक्षम प्रशासनाधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी करत याबाबतचे लेखी निवेदन देखील आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेऊन दिले आहे.यावेळी शिष्टमंडळात मनविसे जिल्हा सचिव हर्षल भोईर, ऍड.सुनील देवरे,उपजिल्हाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा सहसचिव मिलिंद खंडागळे,वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष अफसर खान,कामगार सेना उपचिटणीस दयानंद पाटील,मनसे उपशहराध्यक्ष कुमार पुजारी,उपतालुकाध्यक्ष भावेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भिवंडी मनपाच्या शहरात एकूण १०२ शाळांमधून सुमारे २४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु पालिका शिक्षण विभागासाठी प्रशासन अधिकारी नसल्याने शिक्षण विभागावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसल्याची खंत यावेळी चौधरी यांनी आयुक्तांसमोर व्यक्त केली.महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे वार्षिक बजेट ६४ कोटी रुपयांचे आहे. मात्र प्रभारी व शिक्षण विभाग बाबत ज्ञान नसलेले प्रशासनाधिकारी नेमल्याने शहरात शिक्षण विभागाचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप चौधरी यांनी यावेळी केला.त्यातच पालिका प्राथमिक शिक्षण विभागात तीन वर्षांपासून प्रभारी प्रशासनाधिकारी असल्याने लवकरात लवकर शिक्षण विभागात कर्तव्यदक्ष असा प्रशासन अधिकारी नेमावे अन्यथा आयुक्तांच्या दालनात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मनपा आयुक्तांना मनविसेनेच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी दिली आहे.