अजित मांडके
ठाणे : काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनाने कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु येथील दोनही सहाय्यक आयुक्त आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर न राहता त्यांनी प्रशासनालाच एक प्रकारे आव्हान दिले होते. अखेर राजकीय दबावापोटी प्रशासनाला बदलीचे आदेश मागे घ्यावे लागले आहेत. यात वर्तकनगर प्रभाग समिती पुन्हा सचिन बोरसे यांच्याकडेच राहणार असून ते वागळे प्रभाग समितीत हजर न झाल्याने नौपाडय़ाच्या प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्याच खांद्यावर त्याची अतिरिक्त जबाबदारी पुन्हा सोपविण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामांचा ठपका ठेवत काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने कळव्याचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर तर वर्तकनगरचे सचिन बोरसे यांची वागळे आणि कळव्याच्या सहाय्यक आयुक्तपदी नवी मुंबईचे सुबोध ठाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार ठाणेकर हे कळवा प्रभाग समितीत हजर झाले. मात्र बोरसे आणि जाधव यांनी आपला नवा चार्ज स्विकारला नव्हता. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने या दोघांनाही कारणो दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीसीला देखील वटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्या. त्यात या प्रकरणात राजकीय दबाव येणार असल्याची माहिती पुढे आली होती. असे असतानाच पालिका प्रशासनाने कळवा वगळता वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समिती सहायक आयुक्त बदल्यांचे आदेश मागे घेतले आहेत. यामुळे कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव यांची निवडणुक विभागात बदली झाली असून त्यांच्या जागी सुबोध ठाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सचिन बोरसे यांच्याकडे वर्तकनगर प्रभाग समितीचा तर अजय एडके यांच्याकडे वागळे इस्टेट प्रभाग समितीचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे.