लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मी आधी जसा होतो, पुढेही तसाच राहीन. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी काम केले आहे. एक कार्यकर्ता म्हणून अखंडपणे तुमच्यासाठी काम करीत राहीन. मुख्यमंत्रिपदाची हवा कधीही डोक्यात जाणार नाही. जगाला हेवा वाटेल असा राज्याचा विकास करूयात, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याणमध्ये केले.
धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण योजनेअंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन पूर्वेकडील चक्कीनाका येथील गुणगोपाल मैदानात करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कामगार कल्याण योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, मातृत्व वंदन योजना आदी विविध योजनांच्या सुमारे १० हजार लाभार्थ्यांना अनुदान निधी, पेन्शन, किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, आजवर नेहमीच देण्याचे काम केले आहे. यापुढेही देत राहील. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना केवळ मंत्रालयात कागदावर न राहता त्या लोकांच्या घराघरांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.
‘डबल इंजिनमुळे महाराष्ट्राचा विकास वेगात’
केंद्र व राज्यात एकाच विचारांच्या युतीचे डबल इंजिन सरकार असल्याने महाराष्ट्राचा विकास वेगात सुरू आहे. मुंबई पालिकेसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी अशा सर्वच महापालिकांत जर आपली सत्ता आली तर डबल इंजिन सरकार एखाद्या वेगवान एक्सप्रेससारखे सुसाट धावेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याणमधील यशवंतराव क्रीडा संकुलातील कार्यक्रमात व्यक्त केला. यावेळी बीएसयुपी योजनेतील घरांच्या लाभार्थ्यांना चावी वाटप, मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण व अपंगांना व्हीलचेअरचे वाटप झाले.