कसारा - अतिदुर्गम आदिवासी पाड्यात अद्यापही हवीतशी रुग्णसेवा पोहोचलेली नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला.
महिलेला प्रसूतीच्या वेदना सहन होत नव्हता. महिलेची अवस्था लक्षात घेत १०८ रुग्णवाहिकेतील डॉ. चंद्रशेखर कासार यांनी सहकारी प्रकाश शिंदे व महिलांच्या मदतीने महिलेची रस्त्यातच प्रसूती केली. सध्या बाळ आणि महिला सुखरूप असले तरी चांगली आरोग्य सुविधा कधी पदरी पडणार, असा प्रश्न यानिमित्ताने अतिदुर्गम भागात पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
सकाळच्या सुमारास हिरा सुरेश खोडका (२१) या गरोदर महिलेस प्रसूतीकळा येऊ लागल्याने तिची प्रकृती बिघडली. पती सुरेश यांनी १०८ हेल्पलाइनला फोन करून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका कोळीपाडा येथे पोहाेचल्यावर रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी गरोदर महिलेची तपासणी करून तिला कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेत गरोदर माता व तिच्यासोबत नातेवाईक महिला सोबत घेऊन प्रवास सुरू केला.
खडतर रस्त्याची भरखडतर रस्त्यावरून रुग्णवाहिका कसाऱ्याकडे येण्यासाठी निघाली. रुग्णवाहिका सुसारवाडी रस्त्याला लागल्यानंतर गर्भवतीला तीव्र वेदना होऊ लागल्या. त्रास असह्य होत असल्याने रुग्णवाहिकेतील डॉ. कासार यांनी प्रसंगावधान राखत सहकारी शिंदे यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितली. डॉक्टरांनी तत्काळ महिलेची तपासणी करून तेथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
दुर्गम भागात जाणारे रस्ते खडतर आहेत. रुग्णसेवेसाठी १० ते १५ किलोमीटर अंतराशिवाय रुग्णालये नाहीत. त्यामुळे कधी कधी अनेक अडचणींचा सामना येथील आदिवासी बांधवांना करावा लागतो. - डॉ. चंद्रशेखर कासार