भिवंडी:
दि.५- भिवंडी महापालिकेने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून स्व.राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र हे काम करताना वाहतूक नियमांना तिलांजली देत थेट रस्त्याची अडवणूक केल्यामुळे महापालिका मुख्यालयासमोरच वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून मनपाच्या या सुशोभीकरणाचा त्रास वाहतूक पोलिसांसह शहरातील नागरिकांना होत आहे.भिवंडीत वीज वितरण करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्या सीएसआर फंडातून शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलाच्याखाली सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. कल्याण नाका ते महापालिका मुख्यालय, तहसीलदार कार्यालय, पोलीस उपायुक्त कार्यालयापासून थेट स्व इंदिरा गांधी रुग्णालयाच्या स्वागत कमानीसमोर हे सुशोभीकरण करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने उड्डाणपुलाखालचा रस्ता बंद करून हे सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने वळविण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागत आहे,तर शासकीय कार्यालयांमध्ये जाण्यासाठी देखील लांबून वळसा मारून जावे लागत आहे.
त्याचबरोबर गैबी नगर शांतीनगर येथे जाण्यासाठी नागरिकांना वाहतूक नियमांना बगल देत विरुद्ध दिशेने वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची देखील मोठी दमछाक होत असते मात्र या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे सध्या मनपाच्या या सुशोभीकरणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.