बदलापूर : बदलापूरमधील अत्याचाराची घटना घडलेल्या शाळेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त करण्यात आले असून शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक या नात्याने उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तत्काळ संचालक मंडळ बरखास्त केले.
शाळेचे कामकाज चालवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्या मदतीसाठी सल्लागार म्हणून अंबरनाथचे गटशिक्षण अधिकारी राजकुमार जतकर आणि नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांची नेमणूक केली आहे. शासनाने नेमलेल्या प्रशासकांनी पदभार स्वीकारला. पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, शाळेचे कामकाज आणि वर्ग नियमित सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.