मीरारोड - रविवारी भाईंदर पश्चिम येथील जेट्टीवरून पोहण्यासाठी खाडीत उडी मारून बुडालेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवाना चा मृतदेह मंगळवारी मुर्धा खाडी जवळ तरंगताना आढळून आला.
भाईंदर खाडी किनारी कांदळवन संरक्षण साठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान रमेश पाटील (३४) रा. कुर्ला हे रविवारी १६ जुलै रोजी जेट्टी जवळ तैनात होते. ड्युटी संपल्या नंतर सायंकाळी चारच्या सुमारास पाटील हे खाडीत पोहण्यासाठी कपडे, घड्याळ आदी काढून जेट्टीवरून पाण्यात उतरले. काहीसे पोहत नाही तोच पाण्याला प्रचंड वेग असल्याने ते बुडून वाहून गेले होते.
गेले दोन दिवस महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मच्छीमार, पोलिसांची गस्ती बोट द्वारे पाटील यांचा शोध सुरू होता. आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास भाईंदर खाडी वरून मुर्धा कडे जाणाऱ्या मुर्धा खाडीच्या पाण्यात पाटील यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. मृतदेह भाईंदर धक्का येथे आणून तो पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. भीमसेन जोशी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात मृतदेह पाठवण्यात आला आहे.