मुंब्रा : मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे चार दिवसांपासून आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या रोहित गुप्ता या २७ वर्षांच्या तरुणाने अखेर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या मागच्या बाजूला असलेल्या चुहा पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्या केली. तो बायपास रस्त्याजवळील गावदेवी नगरमधील गणेशनगर येथील एका हॉलजवळ राहत होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याचे वडील राजकुमार यांना फोन करून ‘कुटुंबातील सगळ्यांची काळजी घ्या,’ असे सांगितले आणि त्यानंतर उडी मारली. त्याचे बोलणे ऐकताच वडील घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत त्याने खाडीत उडी मारली होती. मागील चार दिवसांपासून तो आत्महत्या करण्याच्या हेतूने पुलावर येत होता. त्याचे वडील समजावून त्याला घरी नेत होते. गुरुवारी सकाळी त्याचे वडील त्याने आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त व्हावे यासाठी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते, अशी माहिती त्याचा भाऊ राहुल याने दिली. दरम्यान, तीन तासांपासून रोहितच्या मृतदेहाचा शोध घेतल्यानंतरही तो आढळून आला नसल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी अविनाश सावंत तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे स्थानकप्रमुख तांबेश्वर मिश्रा यांनी दिली.