अंबरनाथ: आपल्या गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी एका प्रियकराने तो काम करत असलेल्या जुन्या मालकाच्या दुकानात चोरी केली आहे. या चोरीच्या रकमेतून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला आयफोन आणि दुचाकी गाडी घेऊन दिली. या चोरी प्रकरणात कोणताही पुरावा नसताना केवळ प्रियकराने मोबाईलच्या स्टेटसवर गाडी घेतल्याचे आणि आयफोन गिफ्ट दिल्याचे फोटो ठेवल्याने हा गुन्हा उघड झाला.
अंबरनाथ पश्चिम भागात सुनील महाडिक यांचे अगरबत्ती भांडार आणि नारळाचे दुकान असून या दुकानात राज आंबवले हा तरुण काही महिन्यांपूर्वी कामाला होता. कामाच्या ठिकाणी पैशांची अपरातफर करत असल्याने त्याला मालकाने यापूर्वीच कामावरून काढले होते. राज आंबवले असे या तरुणाचे नाव असून त्याने 24 ऑगस्टला पहाटे तो काम करत असलेल्या जुन्या मालकाच्या दुकानात गेला. त्या ठिकाणी नारळ विक्रेत्याला देण्यासाठी ठेवण्यात आलेली अडीच लाखाची रोकड आणि एक सोन्याची चेन लंपास केली. महाडिक हे सहजासहजी दुकानातील गल्ल्यात एवढी मोठी रक्कम ठेवत नव्हते. मात्र योगायोगाने नारळ वाल्याचे पैसे देण्यासाठी त्यांनी ती रक्कम जमा केली होती.
मात्र संबंधित व्यापारी न आल्याने ती सर्व रक्कम दुकानाच्या गल्ल्यात ठेवली होती. या दुकानाच्या गल्ल्याच्या चाव्या कुठे असतात याची कल्पना राजला होती. त्यांने दुकानात जाऊन दुकानातील सर्व रोकड आणि सोन्याची चेन लंपास केली. याप्रकरणी 24 ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच महाडिक यांना राज्याच्या मोबाईल स्टेटसवर नवीन आयफोन घेतल्याचा आणि नवीन दुचाकी गाडी घेतल्याचे फोटो दिसले. आर्थिक क्षमता नसताना देखील मोबाईल आणि गाडी आली कुठून असा संशय महाडिक यांना निर्माण झाला. तो संशय महाडिक यांनी पोलिसांना सांगितला असता पोलिसांनी लागलीच राजला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या रकमेतून त्याने आपल्या गर्लफ्रेंडला गाडी आणि नवीन आयफोन विकत घेऊन दिला होता. गर्लफ्रेंडचे शौक पूर्ण करण्यासाठी राजाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे.