ठाणे: मुंबईकडून कल्याण कडे जात असलेल्या कारने गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. ही घटना पुर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई नाशिक वाहिनीवर विवियाना मॉल समोर घडली. वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवून कार रस्त्याच्या एका बाजूला करून गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे कार चालकासह अकरा जण बचावले असून यामध्ये 05 बालकांचा समावेश आहे. कार चालक विश्वनाथ भोईर हे 4 महिला, एक पुरुष आणि पाच लहान मुलांना मुंबईतून घेऊन कल्याण येथे निघाले होते. ठाण्यातून जात असताना, त्यांची कार विवियाना मॉल समोर आल्यावर कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कार चालक भोईर यांनी कार बाजूला घेत, गाडीतील प्रवाशांना बाहेर काढताच कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राबोडी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर 15 मिनिटांनी म्हणजे सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून अकरा जण बचावले आहेत. तसेच यावेळी ०१- फायर आणि ०१- रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ठाण्यात दी बर्निंग कार ; अकरा जण बचावले
By अजित मांडके | Published: May 31, 2024 2:56 PM