ठाणे : कळवा हॉस्पीटलमध्ये झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यु नंतर येथील मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात थेट मुलाखतीद्वारे ७२ नर्सची भरती प्रक्रिया राबिवली गेली. परंतु आलेल्या उमेदवारांना बाहेरील वऱ्हांड्यात जमिनीवर बसून अर्ज भरावे लागल्याचे गंभीर बाब दिसून आली. त्यामुळे याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या युवक कॉंग्रेसने महापालिकेला जाब विचारला. मात्र आलेल्या उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे हाल झाले नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. कळवा रुग्णालयात २१० नर्सेसची पदे मंजुर आहेत. त्यातील १८० पदे भरली गेली आहेत. त्यानुसार केवळ ३० पदे रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता थेट मुलाखती घेण्यास सुरवात झाली. मात्र ठाण्यासह इतर जिल्ह्यातून ४०० हून अधिक परिचारीकांना येथे हजेरी लावली.
अगदी सकाळी ८ वाजल्यापासून या परिचारीका त्याठिकाणी आल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने सुरवातीला त्यांना नरेंद्र बल्लाळ सभागृहात बसविले. त्यानंतर महत्वाची बैठक असल्याने त्यांना तेथून हलवून बाहेरील वऱ्हांड्यात बसविण्यात आले. यावेळी अनेक परिचारीका आपल्याला काम मिळावे म्हणून माघारी न जाता जमीनीवर बसून अर्ज भरतांना दिसून आल्या. त्यावरुन काहींनी नाराजी देखील व्यक्त केली. याची माहिती राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विरु वाघमारे यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महापालिका प्रशासनाकडे याचा जाब विचारला. आलेल्या परिचारांचे हाल होऊ नये या उद्देशाने पालिकेकडे जाब विचारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे महापालिकेचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी परिचारीकांचे कोणत्याही प्रकारे हाल न झाल्याचे स्पष्ट केले आहे. सकाळी ८ वाजल्या पासून परिचारीका येत होत्या. परंतु त्यांना पाणी, चहा किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्यांचे हाल होऊ नये याची काळजी घेतली गेली होती. परंतु मधल्या काळात एक बैठक घेतली गेल्याने काही वेळ त्यांना बाहेरील वऱ्हांड्यात बसविण्यात आले होते. परंतु परिचारींकांचे हाल झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.