अंबरनाथ पश्चिमेच्या हिंदू स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आठनंतर अंत्यसंस्काराकरिता आलेल्या मंडळींना आता स्मशानभूमी बंद झालीय, उद्या सकाळी आठ वाजेनंतर मृतदेह घेऊन या, असे संतापजनक उत्तर स्मशानभूमी कर्मचाऱ्याने दिले. हा कर्मचारी स्मशानभूमीला कुलूप ठोकून निघून गेल्याने मृतदेहासह दीड तास ताटकळावे लागले. स्मशानभूमी रात्री आठ वाजता बंद करून कर्मचाऱ्यांनी निघून जाण्याची ही कृती अत्यंत धक्कादायक आहे. अखेर अंबरनाथमधील काही मंडळींनी मध्यस्थी करून पूर्व भागातील स्मशानभूमी उघडून त्या ठिकाणी या मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला.
अंबरनाथ येथील सर्वोदयनगर परिसरात मृत झालेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा त्यांच्या मित्रपरिवाराच्या मदतीने काढण्यात आली. मोजकेच नातेवाईक असल्याने इमारतीत राहणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. अंबरनाथ नगरपालिकेत अंत्यसंस्कारासाठी सर्व अर्ज दाखल केल्यानंतर अंत्ययात्रा अंबरनाथ पश्चिम भागातील हिंदू स्मशानभूमीजवळ आली. मात्र, त्या ठिकाणी संस्थेमार्फत काम करणारे कर्मचारी रात्री स्मशानभूमीला कुलूप लावून निघून गेल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मंडळींना मृतदेहासह स्मशानाबाहेरील रस्त्यावर ताटकळत राहण्याची वेळ आली. स्मशानभूमीच्या गेटवर संपर्कासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने ‘आता सकाळी आठ वाजता मृतदेह घेऊन या तेव्हाच अंत्यसंस्कार होतील’, असे बेमुर्वतखोरपणे उत्तर दिले. यामुळे काही तरुण चिडले; परंतु प्रसंग दु:खद असल्याने त्यांनी मनावर दगड ठेवला.
मोबाइल केला बंदमृतदेह रात्रभर कुठे ठेवावा व सकाळी आठ वाजेपर्यंत कुठे थांबावे, असा प्रश्न दूरवरून आलेल्या नातलग, मित्र यांना पडला होता. एवढेच नव्हे, तर त्या कर्मचाऱ्याने आपला मोबाइल बंद करून ठेवल्याने पुढे चर्चा खुंटली. या घटनेची माहिती अंबरनाथच्या पत्रकारांना मिळताच त्यांनी लागलीच ही अंत्ययात्रा अंबरनाथ पूर्व भागातील स्मशानभूमीकडे नेण्याची सूचना केली, तसेच त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याला मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या. त्या मृतदेहावर तब्बल दीड तासानंतर अंबरनाथ पूर्व भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.