ठाणे : केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळवून देण्यासाठी ‘पंतप्रधान आवास योजना’ लागू केली आहे. यामध्ये कोणत्याही विकासकाकडून घर विकत घेतलेल्या परिवाराला या योजनेखाली दोन लाख ५० हजार रुपये मोबदला मिळत आहे. मात्र, आता ही योजना ३१ पर्यंतच असून तिचा लाभ मिळण्याची मुदत २० मार्चपर्यंत आहे. त्यास अनुसरून ग्राहकांना या रकमेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्यासाठी विकासकांकडून जनजागृती केली जात आहे.
सर्वांसाठी घरे मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ही पीएम आवास योजना लागू केली आहे. मोठ्या रकमेचे घर घेणाऱ्यांसह गरीब, बेघर कुटुंबीयांनाही तिचा लाभ झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील सहा हजार ६९५ कुटुंबीयांना मोफत घराचा लाभ झाला आहे. या घरकुल योजनेचा लाभ भिवंडी तालुक्यात सर्वाधिक गरीब, आदिवासी कुटुंबीयांना झालेला आहे. यात राज्यभरातील सर्व पंचायत समित्यांच्या रँकमध्ये भिवंडी पंचायत समिती प्रथम क्रमांकावर आहे. तर कल्याण तालुक्याचा रँक २५२ आहे. या घरकुल योजनेच्या लाभासह या घर विकत घेणाऱ्यांना दोन लाख ५० हजारांच्या रकमेचा लाभ या योजनेखाली हजारो कुटुंबीयांना लाभ आहे. पण आता ही योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यास जिल्ह्यातील नागरिकांकडून विरोध होत आहे.
२० मार्चपर्यंत येणाऱ्या प्रस्तावाला मिळणार लाभ-
या योजनेखाली येणाऱ्या सर्व प्रस्तावांना बँकांकडून प्राधान्याने मंजूर केले जात आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. प्रस्ताव येताच बँकांकडून त्यास मान्यता दिली जात आहे, असे लीड बँकेचे मॅनेजर जयानंद भारती यांनी सांगितले.
कोणाला कशी मिळते सबसिडी-
या योजनेखाली घर विकत घेणाऱ्यास निश्चित केलेल्या निकषावर सबसिडीच्या रकमेची सवलत दिली जात आहे. त्यापोटी लाभार्थ्यास अनुदानाची रक्कम दिली जात आहे. याचा लाभ कोठेही घर नसलेल्या कुटुंबीयाना करून दिला जात आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणाही तैनात आहे.
बिल्डर काय म्हणतात...
१) या योजनेचा लाभ ठाणे शहरात फारच कमी लोकांना झाला आहे. या योजनेची अंमलबजावणी सुयोग्यरीत्या होणे गरजेचे आहे. घर विकत घेणाऱ्यांसाठी ही योजना फारच चांगली आहे. या योजनेत अधिक सुधारणा करून लोकांच्या हितासाठी ती सुरू ठेवणे गरजेचे आहे. फक्त योग्यरीत्या अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
- जितेंद्र मेहता, अध्यक्ष- एमसीएचआय, ठाणे
२) केंद्र व राज्य शासनाने ही योजना सुरूच ठेवणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना, वेतन कमी झालेल्यांना या योजनेच्या सबसिडीचा लाभ देण्यासाठी शासनाने ती सुरू ठेवण्याची गरज आहे. कोरोनामुळे आधीच नकारात्मक मानसिकता तयार झाली आहे. त्यात ही योजना बंद करून त्यात भर पडू नये म्हणून पीएम आवास योजना सुरू ठेवून जास्तीत जास्त लोकांना तिचा लाभ देण्याची काळाची गरज आहे.
- तुषार जितू मोहनदास, कार्यकारी संचालक - मोहन ग्रुप
पंतप्रधान आवास योजनेचा घर खरेदी करताना मध्यमवर्गीय कुटुंबाला काही अंशी आधार मिळत आहे. त्यामुळे सर्वांना घर हे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर ही योजना चालू राहिली पाहिजे.
- दिनेश उमावाणे, आसनगाव, शहापूर
पीएम आवास योजना बंद न करता सरकारने त्यात आणखी सुधारणा करावी. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना घर खरेदी करताना आधार मिळेल आणि त्यांना हक्काचे घर मिळेल. त्यासाठी योजना सुरू ठेवणे आवश्यक आहे.
- दीपक पाटील, कल्याण