उल्हासनगर : महापालिका शाळा मैदानाची सनद चक्क खाजगी संस्थेला दिल्याचा प्रकार उघड झाल्यावर, आयुक्त अजीज शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतली. गेल्याच महिन्यात मैदानांवर अतिक्रमणाचा प्रकार उघड झाल्यावर, मैदानात महापालिकेचे नामफलक लावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. तसेच प्रांत कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील मासे व मटण मार्केट जवळ महापालिकेची शाळा क्रं-१९ व २२ आहे. याच शाळेत महापालिकेचे प्रभाग समिती कार्यालय आहे. आमदार बालाजी किणीकर यांनी दोन दिवसांपूर्वी प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांची भेट घेऊन खुले व शासकीय भूखंडावर सनद देण्यात असल्याचे निवेदन दिले. तर दुसऱ्याच दिवशी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी प्रांतकार्यालयाला पत्र देऊन, महापालिका शाळा क्रं-१९ व २२ शाळेच्या मैदानाची दिलेली सनद रद्द करण्याची मागणी केली. शाळा मैदानावर खाजगी संस्थेला सनद दिल्याचा प्रकार उघड होताच एकच खळबळ उडाली. त्यावर प्रांत कार्यालयाने गुरवारी महापालिका आयुक्तांना स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या महिन्यात शाळा मैदानावर जेसीबी मशीनद्वारे सपाटीकरण केले जात होते. याला स्थानिक माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी, प्रधान पाटील यांच्यासह अन्य जणांनी काळ्या फिता बांधून निषेध व्यक्त करून आंदोलन केले. तसेच शाळा मैदानावर सनद काढणार असल्याचा संशय व्यक्त केला होता. नागरिकांच्या या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवसी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मैदानांवर महापालिका नामफलक लावले होते. मात्र त्यानंतर एका महिन्यातच मैदानावर सनद निघाल्याचे उघड झाले. याप्रकारने महापालिकेच्या मालमत्ता सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. गुरवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान आयुक्त अजीज शेख यांच्यासह महापालिका अधिकाऱ्या सोबत बालाजी किणीकर यांची बैठक झाली असून शाळा मैदानावर दिलेल्या सनद बाबत चर्चा दिल्याचे समजते.
प्रांत कार्यालय पुन्हा वादात? उच्चन्यायालय, जमावबंदी आयुक्त यांच्या आदेशाने व महापालिका नगररचनाकार विभागाच्या अभिप्राय नंतरच सनद दिल्याचे प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांचे म्हणणे आहे. मात्र अभिप्राय देताना सदर मैदान महापालिका शाळेची असल्याचे, संबंधित अधिकारी यांच्या लक्षात आले नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधितांवर कारवाईची मागणी मनसे पक्षासह अन्य सामाजिक संस्थेकडून होत आहे.