मुंबई - मुख्यमंत्रीएकनाथ शिंदें यांच्यातला कार्यकर्ता किंवा लोकांमध्ये मिसळणारा नेता हे बिरुद राज्याच्या प्रमुखपदी असतानाही सातत्याने दिसून येते. गणपती उत्सवात घरोघरो जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खुश केलं, तर नवरात्री उत्सवातही आपल्या ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाचा आनंद द्विगुणीत केला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातील ज्या गल्लीत लहानाचे मोठे झाले, त्या गल्लीतील होळीच्या कार्यक्रमात नातवाचा हट्ट पुरवताना दिसून आले. यावेळी, जवळील एका किराणा दुकानात जाऊन त्यांनी खरेदी केली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचा हाच साधेपणा कार्यकर्त्यांसमवेत दिसून आलाय. एका महिला भगिनीच्या स्टॉलवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत वडा पाववर ताव मारला.
ठाण्यातील चैत्र नवरात्रोत्सव मिरवणुकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तंदुरी वडापाव स्टॉलवर थांबले होते. देवीच्या मिरवणूक आगमान सोहळ्यात सहभागी होत ते थेट वडापावच्या गाडीवर पोहोचले. यावेळी, स्वत:ही वडापाव खाण्याचा आस्वाद घेतला, तर स्वत:च्या हाताने कार्यकर्त्यांना वडापाव वाटला. यावेळी, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के हेही उपस्थित होते. वडा पाव खाल्ल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी खिशातून २ हजार रुपयांची नोट काढून वडा विकणाऱ्या महिला भगिनीला दिली. त्यानंतर, हात जोडून नमस्कार करत ते तिथून निघून गेले. विशेष म्हणजे, उरलेले पैसेही त्यांनी परत घेतले नाहीत. दरम्यान, यावेळीही काहींनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
किराणा दुकानातूनही केली होती खरेदी
मुख्यमंत्री शिंदे काही दिवसांपूर्वी आपल्या नातवाला घेऊन किसननगर येथील होळी उत्सवात सहभागी होते. यावेळी, मोठा लवाजमा, फौजफाटा आणि कार्यकर्त्यांची गर्दीही त्यांच्यासमवेत होती. मात्र, याचवेळी सोबत असलेल्या नातवाने जवळील दुकानातून काहीतरी खरेदी करण्याचा हट्ट केला. त्यामुळे, स्वत: मुख्यमंत्री शिंदे आपल्या नातवाला घेऊन जवळील किराणा दुकानात पोहोचले. त्यांच्यासमवेत मोठी गर्दीही यावेळी होती. अचानक मुख्यमंत्री आपल्या किराणा दुकानात आलेले पाहून दुकानदारही हरखुन गेला. त्याने लहान रुद्रांशसाठी पुड्यात बांधून खाऊ दिला. तर, रुद्रांशसाठी दोन चेंडूही मुख्यमंत्र्यांनी खरेदी केले होते. यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दुकानदाराजवळ येऊन घेतलेल्या मालाचे पैसे दिले.