ठाणे : भाजपचे आमदार किसन कथाेरे यांच्या मुरबाड विधानसभेची जागा मिळत नसल्याचे लक्षात आल्याने शिंदे गटाचे नेते व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे पक्के केले. गुरुवारी शरद पवार गटातील प्रवेशाकरिता मेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, पवार यांना थांबवण्याकरिता कर्जतच्या जागेच्या बदल्यात मुरबाडची जागा भाजपकडून मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने गुरुवारचा मेळावा सुभाष पवार यांनी रद्द केला.
माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाडची जागा लढवण्यास उत्सुक आहेत. भाजपचे आमदार किसन कथोरे हे सातत्याने त्या ठिकाणाहून विजयी होत आहेत. भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचे कपिल पाटील यांचा पराभव झाल्यावर विधानसभा निवडणुकीत काही लोकांचा कार्यक्रम करणार, असा इशारा पाटील यांनी दिला होता. कपिल पाटील व किसन कथोरे यांच्या वादात पाटील यांचा पराभव झाला, अशी भावना कपिल पाटील समर्थकांची आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या सुभाष पवार यांना ही उमेदवारी दिली जावी याकरिता भाजपमधील काही गट प्रयत्नशील असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती.
- मुरबाड सुटत नसल्याने सुभाष पवार यांनी शरद पवार गटातील प्रवेशाकरिता गुरुवारी मेळावा आयोजित केला होता. मात्र, अचानक तो रद्द केला. कर्जतची जागा सोडून त्या बदल्यात मुरबाड घेण्याकरिता शिंदेसेना प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी सुभाष पवार यांना भेटीत दिल्याने त्यांनी मेळावा रद्द करून शरद पवार गटातील प्रवेशाचा बेत रहित केला, अशी चर्चा आहे.