ठाणे : नागला बंदर येथील खाडी किनारा विकसित करणे, पोखरण रोड नं. २ येथील लक्ष्मी-नारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भुखंडावर मराठा भवन उभारणे, लिटील फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंपन भिंत व लेव्हलिंग करून सुशोभिकरण करणे, शिवाईनगर येथील कै. सुधाकर चव्हाण इमारतीचे भुमिपूजन करणे आदींसह इतर विकास कामांच्या भुमीपुजन करण्याच्या कामासंदर्भात मंगळवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची वेळ घेतली.
यावेळी त्यांनी विविध विकास कामांसदर्भात त्यांच्या समवेत चर्चा केला. यावेळी शिवाई नगर भागात कै. सुधाकर चव्हाण यांच्या नावाने बुहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. त्याचे भुमीपुजन देखील लवकरच केले जाणार असून त्यासाठी २५ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजुर केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या कामांच्या भुमीपुजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
समतानगर मधील राजीव गांधी नगर, आनंदराम नगर, मिलिंद हौसिंग सोसायटी तसेच लोकमान्यनगर मधील सिध्दिविनायक सोसायटी या परिसरातील सर्व रहिवाश्यांनी १९९७ साली ठाणे महानगर पालिकेच्या रस्ता रूंदीकरणासाठी स्वत:च्या घरांची जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळेच या ठाणे शहराचा चेहरामोहरा बदलेला आपल्याला दिसून आला. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार ३२३ स्के. फुट कारपेट म्हणजेच दोन बाथरूमसह वन बीएचकेची घरे या परिसरातील सुमारे ४५० रहिवाश्यांना मोफत देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याची मागणी देखील सरनाईक यांनी लावून धरली होती. अखेर त्याचा मार्ग देखील आता मोकळा झाला असून त्या कामाचे भुमीपुजन देखील लोकसभा निवडणुकीच्या आचरसंहितेच्या आत करावे अशी मागणी त्यांनी केली.
ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात सरनाईक यांच्या माध्यमातून विविध विकाम कामे हाती घेण्यात आली आहेत. वसंतविहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग, बँक्वेट हॉल, तसेच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचे भुमिपूजन करणे, लोकमान्यनगर येथील सिध्दिविनायक पुर्नवसाहत, आनंदराम नगर व राजीव गांधीनगर या वसाहतींचा विकास करणे, तसेच एम.एम.आर.डी.ए. तर्फे करण्यात येणाऱ्या घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे. या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी लोकसभा-२०२४ च्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापुर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी मागणीही त्यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.