उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत ४ ते ५ वेळा नगरसेवकपदी निवडून येणाऱ्या दबंग नगरसेवकांनी मुले व पत्नीचे नशीब अजमावण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यास सुरुवात केल्याचे चित्र शहरात आहे. दबंग नगरसेवकांच्या मुलांचे नाव पुढे आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
उल्हासनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पालिकेवर सर्वाधिक सत्ता शिवसेना व मित्रपक्षाची राहिली आहे. गणेश चौधरी हे महापालिकेचे व शिवसेनेचे पहिले महापौर राहिले आहेत. चौधरी यांच्यानंतर शिवसेनेच्या यशस्विनी नाईक, विद्या निर्मल, राजश्री चौधरी, अपेक्षा पाटील, लीलाबाई अशान आदींनी महापौरपद भूषविले आहे. शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी पक्षातील काही दबंग नगरसेवक सातत्याने निवडून येतात. त्यापैकी सी ब्लॉक परिसरातून निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकाने मुलाला निवडणूक रिंगणात उतरवण्याचा चंग बांधला आहे. त्याच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन केले जात आहे. तीच परिस्थिती बिर्ला मंदिर परिसरातून निवडून येणाऱ्या शिवसेना नगरसेविकाच्या मुलाची आहे. सोनार गल्लीतून भाजप नगरसेविकेचा मुलगा, गोलमैदान परिसरातून भाजप आमदार व माजी महापौराचा मुलगा, सी ब्लॉकमधून शिवसेना नगरसेवकाचा मुलगा, ओटी सेक्शन कॅम्प नं. ४ मधून शिवसेना नगरसेवकांचा मुलगा यांच्या हस्ते विविध उपक्रमांचा धडाका सुरू करण्यात आला आहे.
कॅम्प नं. ४ येथील संभाजी चौक परिसरातून शिवसेना नगरसेवकांचा मुलगा, कॅम्प नं. ५ परिसरातून राष्ट्रवादी नगरसेविकेचा भाऊ, कैलास कॉलनीतून शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांचा मुलगा, कुर्ला कॅम्पमधून काँग्रेस नगरसेविकेचा मुलगा, जुना बसस्टॉपमधून भाजप नगरसेवकांचा मुलगा इच्छुक आहेत. दबंग नगरसेवकांनी आपल्या मुलाचा प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. महापालिकेत ५ ते ६ वेळा नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर मुले व पत्नीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र शहरात आहे.
इच्छुक उमेदवार नाराज
सलग तीनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्यांना पक्षाने तिकीट देऊ नये, अशी मागणी पक्षाकडे इच्छुक उमेदवार करीत आहेत. तसेच, त्यांची मुले, पत्नी व जवळच्या नातेवाइकांना तिकीट नाकारावे, अशी नव्याने इच्छुक असलेल्यांकडून मागणी हाेत आहे.