मीरारोड - एमआयडीसीच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व उडाल्याने मीरा भाईंदर शहराचा पाणी पुरवठा १० तास बंद झाला . त्यामुळे नागरिकांना १० तास उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे .
मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) कडून पाणी पुरवठा करण्यात येतो. शनिवारी सकाळी बदलापूर येथील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनी वरील एअर व्हॉल्व उडाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले . त्यामुळे एमआयडिसीने मीरा भाईंदर चा पाणी पुरवठा सकाळी ६ वाजल्या पासून बंद करण्यात आला . एअर व्हॉल्व च्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून दुपारी ४ च्या सुमारास साकेत पंपिंग येथून पाणी पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला .
१० तास शहराचा पाणी पुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना देखील नियोजित तासाने पाणी पुरवठा न होता साधारण १० तास उशिराने पाणी मिळेल व कमी दाबाने मिळेल . स्टेम प्राधिकरणाचे पाणी सुरु राहणार असले तरी शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत होण्यास दोन दिवस जाणार असल्याने नागरिकांनी पाणी काटकसरीने व जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे .