मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने अद्यावत अँड्रॉइड बेस ऍप द्वारे आता पोलिसांची गस्त सुरू केली असून या मुळे गस्तीसाठी आलेल्या पोलिसदादाची माहिती परिसरातील नागरिकांनासुद्धा मोबाईलवरून मिळणार आहे. जेणे करून पोलिसांशी नागरिक सहज संपर्क करू शकणार आहेत. ४ पोलीस ठाण्यात ही यंत्रणा सुरु केली असून उर्वरित १२ पोलीस ठाण्यांमध्ये येत्या काही दिवसांतच ती सुरू केली जाणार आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिली. नागपूर, बंगळुरूपेक्षा अद्यावत तंत्रज्ञानचा वापर केला गेला आहे.
मीरा भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेस १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न पोलिसांनी ह्या अद्यावत तंत्रज्ञाना द्वारे केला आहे. बेंगळुरू व नागपूर शहरात पोलीस बीटमार्शल साठी क्युअर कोड स्कॅनिंग यंत्रणा आहे . परंतु मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांनी त्यापेक्षा अद्यावत यंत्रणा अमलात आणली असून आता पोलिसांना क्युआर कोड स्कॅन करण्याची गरजच राहणार नाही.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मीरा भाईंदर मध्ये ६ तर वसई - विरार भागात १० पोलीस ठाणी आहेत. आणखी काही नवीन पोलीस ठाणी सुद्धा सुरु होणार आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणारे बिट मार्शल यांची माहिती परिसरातील नागरिकांना होत नाही. तर बिट मार्शल हे खरंच गस्त घालतात का ? याची सुद्धा खात्री अनेकवेळा देता येत नाही. नागरिकांना आपल्या भागात पोलीस गस्त घालत आहेत याची माहिती व्हावी व पोलिसांची उपस्थिती आणि सुरक्षेची खात्री होण्याच्या अनुषंगाने या दोन्ही शहरात ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता पोलिसांची गस्त चालणार आहे.
१ ऑक्टोबर पासून काशीमीरा , माणिकपूर , पेल्हार आणि विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिट मार्शल यांची गस्त ह्या एप द्वारे सुरु करण्यात आली आहे. उर्वरित पोलीस ठाण्यातील पोलिसाना त्या एप व वापरण्याची पद्धत याची माहिती देण्याचे काम सुरु आहे. पोलिसांच्या मोबाईल मध्ये हे एडव्हान्स अँड्रॉइड व जिओ टॅगिंग बेस एप डाउनलोड केले असून त्यांच्या हद्दीतील ठरवलेल्या गस्ती पॉईंटच्या २० मीटर परिधात ते बिट मार्शल पोहचताच पॉपअप होईल व त्या पोलिसाने ओके करताच त्याची नोंदणी होईल. जेणे करून त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक , सहायक आयुक्त , उपायुक्त व आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात त्याची माहिती होणार आहे.
इतकेच नव्हे तर परिसरातील रहिवाशी , बँक वा महत्वाच्या आस्थापना यांनी शमहती दर्शवल्यास त्यांच्या मोबाईल मध्ये गस्त घालण्यासाठी आलेल्या पोलिसांचे नाव , भ्रमणध्वनी क्रमांकची माहिती संदेश द्वारे मिळणार आहे. जेणे करून आपल्या भागात पोलीस आले आहेत हे त्यांना कळणार आहे. नागरिक बिट मार्शल सोबत कॉल वर वा प्रत्यक्ष सुद्धा भेटून बोलू शकणार आहेत. गस्ती पॉईंट वर पोहचण्याची आणि निघण्याची वेळ सुद्धा आपोआप नोंद होणार आहे. त्या गस्ती पॉईंट वर बिट मार्शल ३ ते ५ मिनिटे थांबणार आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ४ बिट तर एका बिट चे सुमारे १५ ते २० पॉईंट धरून रोज १२०० ते १५०० पॉइंटवर दोन पाळ्यां मध्ये पोलिसांची गस्त नोंद होणार आहे. ह्यात भविष्यात वाढ सुद्धा होणार आहे. ह्या यंत्रणे साठी आयुक्त व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीदळवण व माहिती तंत्रज्ञान विभागाचे पोलीस निरीक्षक आरिफ सय्यद व त्यांच्या पथकाने मेहनत घेतली आहे.