असुविधांबाबत कॉंग्रेसने विचारला कळवा रुग्णालय प्रशासनाला जाब
By अजित मांडके | Published: August 14, 2023 03:57 PM2023-08-14T15:57:49+5:302023-08-14T15:58:57+5:30
शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत कळवा रुग्णालयात तब्बल १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यु झाल्यानंतर सोमवारी कॉंग्रेसच्या वतीने रुग्णालयात जाऊन रुग्णालयाचे अधिष्ठता यांना जाब विचारला. यावेळी खासदार कुमार केतर यांच्यासह शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी अपुऱ्या सुविधा, रुग्णांना उशिराने मिळणारे उपचार, मृत्यु मागची कारणे आदींसह सुपरस्पेशलिटी हॉस्पीटलला सुविधा पुरविण्यापेक्षा कळवा रुग्णालयाला आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरविण्याची मागणी यावेळी कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली.
शनिवारी रात्री ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत कळवा रुग्णालयात तब्बल १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानंतर, रविवारी या रुग्णालयात जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी रुग्णालय प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला. त्यानंतर सोमवारी कॉंग्रेसने देखील कळवा रुग्णालयाला जाब विचारला. यावेळी खासदार केतकर यांनी आम्ही येथे जाब विचारला आलो नसून नेमकी ही घटना का घडली, कोणत्या चुका झाल्या, कशामुळे घडली याची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. परंतु दुसरीकडे कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी रुग्णालयातील असुविधांचा पाढाच वाचला. याशिवाय कळवा रुग्णालयातील मेडीकल का बंद आहे, रुग्णांना सर्व प्रकारची औषधे का मिळत नाहीत, रुग्णालयाचा ताण वाढत होता, तर मग पर्यायी विचार का झाला नाही, रुग्णांना मिळत असलेले जेवण वेळत मिळत नसल्याचेही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले.
एकीकडे ग्लोबल रुग्णालयाला कोट्यावधींचा खर्च केला जात आहे. मात्र दुसरीकडे कळवा रुग्णालयाच्या सुविधांकडे दुर्लक्ष का केले जाते, मुळात येथे येणाºया गोरगरीब रुग्णांना किमान चांगले उपचार मिळावेत, त्यादृष्टीने सोई सुविधा पुरवा असा सल्लाही यावेळी चव्हाण यांनी दिला. यावेळी त्यांच्या समवेत प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षाचे ठाणे शहराचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यानी कळवा येथील छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालयात येऊन ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी याना रुग्णालयाच्या दैनीय अवस्थे बाबत जाब विचारला . व्हिडिओ : विशाल हळदे#Congress#KalwaHospitalpic.twitter.com/X0RQd93KWQ
— Lokmat (@lokmat) August 14, 2023
यावेळी संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना घेराव घालत या सर्व प्रकरणाचा जाब विचारला. परंतु परिस्थिती सुधारली नाही तर मात्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी दिला.
कॉंग्रेसचे दोन गट -
यावेळी खासदार कुमार केतरक व प्रदेश सचिव राजेश जाधव यांनी कळवा रुग्णालयात हजेरी लावली. त्यानंतर अगदी काही क्षणात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण हे आपल्या पदाधिकाºयांसह त्याठिकाणी हजर राहिले. यावेळी खासदारांना जराही बोलू न देता चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर चव्हाण हे आपल्या पदाधिकाºयांना घेऊन तेथून निघून गेले. यातूनच कॉंग्रेसमध्ये शहर आणि प्रदेशमध्ये असलेली घुसमट यावेळी दिसून आली.