बदलापूर: गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झालेल्या बदलापूर पश्चिमेकडील गांधी नगर रस्त्याच्या कामाचा अखेर शुभारंभ करण्यात आला आहे. या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असून येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते गांधीनगर रस्त्याचे भूमिपूजन करून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, स्थानिक माजी नगरसेवक किरण भोईर, राजेंद्र चव्हाण, सागर घोरपडे, प्रविण चौधरी आदी उपस्थित होते. बदलापूर पश्चिम बाजारपेठ स्टेशन लगत असल्याने सकाळ संध्याकाळी चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या व कामावरुन येण्याच्या वेळेत या रस्त्यावर मोठी गर्दी होत असते. त्यात सकाळी संध्याकाळी भाजीपाला व अन्य दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचीही गर्दी होत असते. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहनकोंडी होत असल्याने या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांची गैरसोय होत असते.
अशा परिस्थितीत गांधी नगर रस्त्याने बाजार पेठेत न जाता थेट शनीनगर, मोहनांनद नगर, मांजर्ली, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, सानेवाडी आदी भागात जाणे शक्य होते. त्यामुळे दुरवस्था झालेल्या गांधीनगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र या रस्त्याच्या जागेच्या असलेल्या खाजगी मालकीचा प्रश्न व रस्त्यात येणाऱ्या घराच्या पुनर्वसनाचा प्रश्न यामुळे हे काम रखडले होते. मात्र नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता आमदार किसन कथोरे यांच्या मध्यस्थीने संबंधितांशी चर्चा करून या रस्त्याची दुरुस्ती करण्यावर एकमत झाले. बॉक्स: आमदार कथोरे यांनी दिला २० लाखांचा निधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमात २० लाख रुपयांचा निधी तर किरण भोईर यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेच्या माध्यमातून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यातून या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत