ठाणे : दोन वर्षांच्या कोरोना काळात ठाणे महापालिकेने वॉटर, गटर आणि मीटरच्या पलीकडे जाऊन काम केले. ठाण्यात युरोपसारखे रस्ते बनवले नसले तरी या शहरात राहायला लाज वाटणार नाही, अशा सुविधा महापालिकेने दिल्या आहेत. मात्र, आमची एखादी चूक झाली तर जशी टीका होते तसेच केलेल्या चांगल्या कामांचे श्रेयदेखील आमचेच आहे, असा टोला महापौर नरेश म्हस्के यांनी विरोधकांना लगावला. गेले २५ ते ३० वर्षे ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून परमार्थकारणात थोडा स्वार्थ साधायचा असतो, असे महापौरांनी कबूल केले.
म्हस्के म्हणाले की, दोन वर्षांच्या कोरोना काळात महापालिकेने आणि मुख्यत्वे लोकप्रतिनिधींनी ठाणेकरांची साथ सोडली नाही. राज्यातील मुंबई आणि नागपूर या दोन मोठ्या महापालिका असल्या, तरी १२०० बेड्सचे रुग्णालयात १२ दिवसांत उभे करणारी ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका ठरली. ऑक्सिजन असो, रेमडेसिविर किंवा कोरोना लस ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसताना विकत घेऊन ठाणेकरांना मोफत सुविधा दिली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाण्याच्या विकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचा सत्कार होत असल्याने ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे सांगितले. ठाणे शहराला क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा असून ठाणे पर्यावणपूरक शहर म्हणून घोषित होण्यामध्ये ठाणेकरांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
........