भिवंडी - मानकोली येथील रुग्णालय उपकरणे साठविलेल्या गोदमातील घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात छडा लावण्यात नारपोली पोलिसांनी यश मिळविले असून एका आरोपीस ताब्यात घेत त्याच्या जवळून चोरीचा १ कोटी २५ लाख ६१ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मानकोली येथील श्री माँ बिल्डींग या गोदमातील दोन गाळ्यांमध्ये महागडे सोनोग्राफी,रोबोटीक रुग्णालय उपकरणे साठविण्यात आले होते १५ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या उपकरणांची चोरी केली होती.पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील व त्यांच्या सोबत पोहवा जयराम सातपुते,महेश महाले,सुशिल इथापे,समीर ठाकरे,राजेश पाटील,संदीप जाधव, प्रदिप मांजरे,सचिन देसले,जनार्दन बंडगर, विजय ताटे या पथकाने घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना या गुन्ह्याचा तपास करीत एका आरोपीस अटक करीत त्या जवळून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अंधुक प्रकाशातील सीसीटीव्ही पाहून काढला मग...
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी मागे कोणताही पुरावा ठेवला नसताना व गोदाम परिसरात लाईट अथवा सीसीटीव्ही नसल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. घटनास्थळाच्या काही अंतरावरील आजुबाजुस असलेले सिसिटीव्ही मध्ये पहाटेच्या सुमारास एका गाडीच्या लाईटचा प्रकाश दिसुन आल्याने तोच धागा पकडून त्या रस्त्यावरील पुढील सिसिटीव्ही कॅमेरे तपासले असत सदरचा प्रकाश हा एका पिकअप टेम्पो वाहनाचा असल्याचे समजल्यावर पोलीस शिपाई सचिन देसले व जनार्दन बंडगर यांनी या मार्गावरील ३४ ठिकाणी लावलेल्या सिसिटीव्हीची पाहणी करून टेम्पोचा शोध घेत टेम्पो मालक मोहमंद सलीम मोहमंद इद्रीस चौधरी,वय ४१,रा.घुंघट नगर भिवंडी यास अटक केली असून त्याने तीन साथिदारांच्या मदतीने चोरी करून सदरचा माल हा त्याच्या टेम्पो मधुन घेवुन गेला असल्याचे कबुल केले.दरम्यान त्याचे सहकारी आरोपी फरार झाले असून नारपोली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.