लोकमत न्यूज नेटवर्क, वाडा : वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका बंद घरात तीन मृतदेह आढळून आले असून, या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. दरम्यान, या हत्या की आत्महत्या, याबाबतचे गूढ वाढले असून, वाडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत. मुकुंद बेचलदास राठोड (वय ७०), पत्नी कांचन मुकुंद राठोड (वय ६९) व मुलगी संगीता मुकुंद राठोड (५१) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
नेहरोली येथील बोंद्रे आळीत मुकुंद बेचलदास राठोड (७०) यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतः जागा घेऊन एक इमारत बांधली होती. या इमारतीत भाडेकरूसह ते स्वतः पत्नी आणि मुलीसमवेत राहत होते. त्यांची दोन मुले सध्या मुंबईत राहतात. आठ दिवसांपासून वडील, आई व बहिणीचा संपर्क न झाल्याने राठोड यांचा मुलगा सुहास शुक्रवारी दुपारी नेहरोली येथे आला. तेव्हा हा प्रकार उघड झाला. वाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देताच, बाथरूमच्या दरवाजात वडिलांचा मृतदेह आढळला. घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेह आढळला. ही घटना होऊन बरेच दिवस झाल्याने प्रेताला दुर्गंधी सुटली होती. एकूण परिस्थिती पाहून हे तिहेरी हत्याकांड असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
या आत्महत्या की हत्या आहेत, याबाबतचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या संदर्भात वाड्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता, मी बंदोबस्तासाठी पालघर येथे होतो. आता तिथे गेल्यानंतर मी अधिक माहिती घेतो, असे त्यांनी सांगितले.