मीरारोड - मीरा भाईंदरच्या गृहनिर्माण संस्थांच्या उपनिबंधक कार्यालतील मनमानी कारभाराच्या वाढत्या तक्रारींनी संतप्त झालेले शहरातील दोन्ही आमदारांनी अचानक उपनिबंधक कार्यालयात पोहचले. तेथे खाजगी कर्मचारी काम करत होते. पैसे खाऊन चालवलेली मनमानी बंद करा अन्यथा निलंबित करायला लावूच पण पोलीस कोठडीत सुद्धा बसवल्या शिवाय राहणार नाही असा दम संतप्त आमदारांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांना भरला.
मीरा भाईंदर च्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या भ्रष्ट आणि मनमानी कामकाजा बद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन अचानक भाईंदर पश्चिम येथील उपनिबंधक कार्यालयात धडकले. कार्यालयात ३ ते ४ खासगी कर्मचारी काम करत असल्याचे पाहून चुकीचे निर्णय देऊन जो भ्रष्टाचार होतो त्या पैशातून खासगी कर्मचाऱ्यांचा पगार निघतो का ? असा सवाल आमदारांनी उपनिबंधक सतीश देवकाते यांना केला.
आमदारांनी देवकाते यांना फैलावर घेतले. तुम्ही लोकांना न्याय देत नाहीत , भ्रष्टाचार करून व नियमांचे उल्लंघन करून निर्णय देतात. तुमचा व कर्मचाऱ्यांचा कारभार सुधारा. याद राखा , आम्हाला जास्त पुढे जायचे नाहि. आज शेवटची संधी देतोय. अन्यथा तुम्हाला निलंबित करून केवळ घरी नाही थेट पोलिसांच्या कोठडीत बसवू असा दम आमदारांनी भरला.
अनेक सोसायट्यांच्या बाबत जर चुकीचे व नियमबाह्य निर्णय दिले असतील तर तपासून रद्द करा. कार्यालयात दलालांना दलाल थारा देऊ नका अशी समज सुद्धा देवकाते यांना दिली. आ. सारनाईकांचा पारा तर चांगलाच चढल्याचे पाहून देवकाते व कर्मचारी गांगरून गेल्याचे दिसले. त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत मोदी, रक्षा भूपतानी, रिटा शाह, सचिन मांजरेकर आदी होते.