सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, सपना गार्डन परिसरात सिंधूभवनाचे काम गेल्या ६ वर्षानंतर पूर्ण झाले होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. भवनसाठी साडे चार कोटीचा खर्च करण्यात आला असून आमदार आयलानी यांनी पुन्हा २५ लाखाचा आमदार निधी दिला आहे.
उल्हासनगरात उत्तर भारतीय भवन, सिंधूभवन, मराठी भवन आदींची मागणी यापूर्वी वेळोवेळी झाली. सन-२०१६ साली तत्कालीन नगरसेवक व माजी महापौर ज्योती कलानी, नगरसेवक मनोज लासी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सिंधी समाजाची संस्कृती जपली जावी म्हणून सिंधू भवनाची मागणी केली. तसेच प्रस्तावाला मान्यता दिली. त्यासाठी सुरवातीला १ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मात्र त्यानंतर निधीत वाढ करण्यात आली. अखेर ६ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिंधू भवन उभे राहिले असून लवकरच भवनाचे उदघाटन होणार आहे. भवनात सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडण्यात येणार असून यामध्ये सिंधू संस्कृतीची झलक दिसणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.
सिंधू भवनाला वेगळा लूक देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी २५ लाखाचा आमदार निधी देण्याचे घोषित केले. महापालिकेच्या माजी महापौर व माजी आमदार ज्योती कलानी यांचे सिंधू भवनाचें स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक मनोज लासी यांनी दिली. सिंधू भवनासाठी आशा इदनानी, पंचम कलानी, मीना आयलानी, अपेक्षा पाटील, लिलाबाई अशान या माजी महापौरसह तत्कालीन नगरसेवक, विविध पक्ष नेत्याचे सहकार्य लाभले आहे.