ठाणे: अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे आणि पितांबरी सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या "राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धेत आशिष सोहोनी आणि दर्शना पाटील या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. विदर्भातील शेतकऱ्याचे जीवन या विषयावर त्यांनी सादरीकरण केले होते. वारकरी भवन येथील सभागृहात ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत मुंबई ठाण्यासह पुणे कोल्हापूर, सातारा, नाशिक, पनवेल, रत्नागिरी असे राज्यभरातून ५३ स्पर्धक संख्येने सहभागी झाले होते. विविध विषयांवर, विविध वयोगटातील कलाकारांनी परिणामकारक नाट्याविष्कार सादर करून स्पर्धेत रंगत आणली. द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्य विशाल मेटे आणि भूषण गायकवाड यांना रुपये ७ हजार आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. त्यांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील एक प्रसंग सादर केला.
तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या सिद्धांत कुलकर्णी आणि विल्सन खराडे या जोडीने तृतीयपंथी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांना रुपये ५ हजार आणि सन्मानचिन्ह देऊन तसेच, . याव्यतिरिक्त उत्तेजनार्थ म्हणून सेषा आणि सनी हिंदळेकर तसेच सुनील बेंडखळे आणि सचिन काळे यांना रोख १ हजार आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
ह्या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीवनी पाटील आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश निमकर ह्यांनी परिक्षण केले. ह्या वेळी पितांबरी सांस्कृतिक मंचाचे विश्वासदामले यांच्यासह नाट्य परिषद ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि प्रेक्षक मोठ्या संखेने उपस्थित होते.