ठाणे : रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअरबाजारात होणा-या पडझडीमुळे सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. प्रतितोळा पन्नास हजारांच्या वर गेल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. तर, युद्धामुळे महागाईने कळस गाठल्याने अनेकांनी उदरनिर्वाहासाठी नवीन सोने खरेदीपेक्षा मोडण्यावर भर दिल्याचे सराफा बाजारातील वातावरण आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. तर काहींच्या मासिक पगारात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पोटाची खळगी करण्यासाठी या दोन वर्षांत अनेकांनी घरातील दागिने माेडण्यावसर भर दिल्याचे दिसत आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून रशिया-युक्रेन युद्धामुळेसुद्धा सोन्याचे दर वाढले आहेत.
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याच्या दरात अनेक वेळा चढ-उतार झाली. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर २ ते ३ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजाराच्यावर गेला आहे. तर या कालावधीत चांदीच्या किमतीतसुद्धा प्रतिकिलो चार ते सहा हजारांने वाढ झाली आहे. सोनेचांदीचे दर वाढल्याने साहजिकच ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या विक्रीत घट झाली असली तरी ते मोडण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे.
सोने चांदीचे भाव
वर्ष सोने (प्रति तोळा) चांदी (प्रति किलो)
२०२० -४२००० -६२०००
२०२१ -४८०००-६५०००
२०२२- ५१६००- ६९०००
सोन्याच्या मोडीचा भाव
गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: २४ कॅरेट सोन्याच्या किमती वाढल्याने सोन्याची मोडसुद्धा त्याच किमतीत विकली जाते. त्यामुळे तिचा भाव प्रतितोळा ५१ हजार रुपये इतका आहे. सध्या सोने मोडण्याचे प्रमाणसुद्धा नेहमीपेक्षा वाढले आहे.
चांदीचा मोडीचा भाव
चांदीचा प्रति किलोचा सध्याचा दर ६९,००० रुपये इतका आहे. तिच्या मोडीचा दरसुद्धा वाढला आहे.
...म्हणून वाढले सोने माेडण्याचे प्रमाण
सोन्याच्या किमतीत प्रतितोळा जवळपास १५ ते २० हजार रुपये इतकी वाढ झाली आहे. प्रमाणित अर्थात २४ कॅरेट सोन्याच्या किंवा बिस्किटांचा भावसुद्धा तितकाच असतो. त्यामुळे कमी किमतीत घेतलेले सोने वाढीव दराने विकून नफा कमाविण्याच्या उद्देशाने ते विकण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोरोनामुळे रुतलेला आर्थिक गाडा आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेली महागाई यामुळे सोने मोडण्याचे कल वाढला आहेे. मुलांच्या शाळांची फीसह एकंदरीत वाढलेली महागाईमुळे सोन्याचे वाढलेले दर लक्षात ते मोडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दिसून येत आहे.- कमलेश जैन, अध्यक्ष ठाणे ज्वेलर्स असोसिएशन